अधिकच्या 100 ग्रॅम वजनामुळे ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या स्वप्नाचा चक्काचूर झाल्यानंतर स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट शनिवारी मायदेशात परतली. दिल्ली विमानतळावर पाऊल ठेवताच शेकडो समर्थकांना बघताच विनेशला हुंदके अनावर झाले अन् तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मात्र सुवर्णपदक हुकलेल्या विनेश फोगाटचे चाहत्यांनी एका चॅम्पियन खेळाडूच्या थाटात जोरदार स्वागत केले.
पॅरिस ऑलिम्पिकहून हिंदुस्थानात परतलेल्या विनेश फोगाटच्या स्वागतासाठी तिच्या कुटुंबीयांसह शेकडो समर्थक विमानतळावर आले होते. त्या क्षणी विनेश फोगाटच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. ती फक्त अश्रू पुसत राहिली. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंसह इतर अनेक कुस्तीपटूदेखील तिच्या स्वागतासाठी आले होते. आपल्या या सहकाऱ्यांना बघताच विनेशच्या भावना आणखी अनावर झाल्या. या दोघांना मिठी मारत विनेश ओक्साबोक्सी रडली. विनेशच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी पाहता विमानतळावर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस कर्मचारी आधीच तैनात करण्यात आले होते.
View this post on Instagram
यावेळी विनेश फोगाट म्हणाली, ‘मी सर्व देशवासीयांचे आणि येथे आलेल्या प्रत्येकाचे आभार मानत आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.’ विनेशचे देशात चॅम्पियनप्रमाणे स्वागत झाले आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे दिल्ली विमानतळाबाहेर विनेश फोगाटच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती.
आमच्या गावातून आणि आजूबाजूच्या भागातील प्रत्येकजण विनेशच्या स्वागतासाठी येथे दिल्लीला आला आहे. विनेशला सुवर्णपदक मिळाले नाही म्हणून काय झाले, ती आमच्यासाठी चॅम्पियनच आहे. देशाने तिला सुवर्णपदकापेक्षाही मोठा सन्मान दिला आहे, अशी प्रतिक्रिया विनेशची आई प्रेमलता फोगाट यांनी दिली.
जन्मभूमीत विनेशची उघड्या गाडीतून मिरवणूक
हरयाणातील बलाली या आपल्या जन्मभूमीत दाखल होताच विनेश फोगाटची उघड्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. चाहत्यांच्या उदंड प्रेमाने ती भारावून केली. ‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मला जरी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी चाहत्यांच्या या प्रेमाने मी भारावून गेले आहे. तुमच्याकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी एक हजार सुवर्णपदकांहून नक्कीच अधिक आहे,’ अशा शब्दांत विनेश फोगाटने आपल्या भावना व्यक्त केल्या.