हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट शंभर ग्रॅम वजन अधिक भरल्याने पॅरिस ऑलिम्पिकची फायनल खेळू शकली नव्हती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला होता, मात्र त्यांच्या अटी माझ्या मनाला पटल्या नाहीत. माझ्या भावनांची व मेहनतीची मला सोशल मीडियावर खिल्ली उडवायची नव्हती. शिवाय तो फोन राजकीय उद्देशाने आलेला असल्याने मी पंतप्रधानांचा फोन नाकारला, असा दावा विनेश फोगाटने केला.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विनेश फोगाटने हा खळबळजनक दावा केला. ती म्हणाली, पंतप्रधान मोदींचा फोन आला तेव्हा मी रुग्णालयामध्ये होते. मला थेट फोन आला नव्हता. तो हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना आला होता. मला सांगण्यात आले की, तुमच्याबरोबर फोनवर बोलताना कोणीही नसणार. एक व्यक्ती व्हिडीओ शूटसाठी असेल, तर एक सुरक्षारक्षक असेल. मात्र माझ्या टीममधील जर कोणीही नसेल तर मी बोलणार नाही, तसेच माझ्या मेहनतीचा आणि भावनांची सोशल मीडियावर याप्रकारे मी खिल्ली होऊ देणार नाही. तुम्हाला माझ्याप्रति सहानुभूती असेल तर प्रायव्हेटली बोला, सोशल मीडियावर टाकायची काहीही गरज नाही. माझ्या बाजूने फोन रेकार्डिंग करण्याची सोय नव्हती. त्यामुळे आपलं बोलणं एडिट होऊ शकतं, असं मला वाटलं. त्यामुळे मी तो फोन स्वीकारणे स्पष्टपणे नाकारले. मागील दोन वर्षांचा मी नक्कीच हिशेब त्यांच्याकडे मागेन याचीही त्यांना भीती असेल. त्यामुळे त्यांनी माझ्या अटी मान्य केल्या नाहीत. व्हिडीओ रेकॉर्डिंगशिवाय ते माझ्याशी बोलले असते तर नक्कीच आनंद झाला असता, मात्र तो व्हिडीओ कॉल पूर्णतः राजकीय हेतूने केलेला होता, असा आरोपही विनेश फोगाटने केला.