हरयाणातील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी विनेश फोगाट हिने कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मैदानात उडी घेतली. जुलाना मतदारसंघातून तिला तिकीट देण्यात आले आहे. या निवडणुकीत ती तयारीनिशी उतरली असून प्रचारसभा, भेटीगाठीही सुरू आहेत. याच दरम्यान तिने लल्लनटॉपला एक मुलाखत दिली. यात तिने आपल्या स्वप्नातील पंतप्रधान कोण हे देखील सांगितले आहे.
राहुल गांधी की प्रियंका गांधी, यापैकी कोणाला पंतप्रधानपदावर बसलेले पहायचे आहे? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान विनेश फोगाट हिला विचारण्यात आला. याला उत्तर देताना ती म्हणाली की, खरे सांगायचे तर माझे स्वप्न आहे की प्रियंका गांधी यांनी देशाचे पंतप्रधान बनावे. एक महिला म्हणून मला प्रियंका यांना पंतप्रधानपदावर बसलेले पहायचे आहे.
ती पुढे म्हणाली की, राहुल गांधी यांचा स्वभाव चांगला आहे, माणूस म्हणूनही ते चांगले आहेत. पण माझे स्वप्न आहे की प्रियंका गांधी पंतप्रधान बनाव्यात. एक महिला असल्याने राजकारणात महिला पुढे जात असतील तर मला वेगळाच आनंद होतो, असेही ती म्हणाली.
तसेच हरयाणात मुख्यमंत्रीपदावर कुणाला पहायची इच्छा आहे? असे विचारले असता विनेश म्हणाली की, कुमारी शैलजा, दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा यापैकी कुणीही मुख्यमंत्री कुणीही बनो, ते माझ्या हातात नाही. तसे असते तर मीच मुख्यमंत्री झाले असते. कुमारी शैलजा मुख्यमंत्री झाल्या तरी हरकत नाही, त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत.
साक्षी मलिक राजकारणात का आली नाही? याचे उत्तर देताना ती म्हणाले की, हा तिचा वैयक्तिक निर्णय असून बजरंगनेही तिच्यावर दबाव टाकला नाही. कुस्तीमध्ये जाण्याचाही निर्णय माझा होता आणि कुस्ती सोडून राजकारणात येण्याचा निर्णयही माझा आहे. ना आम्ही साक्षीवर दबाव टाकू शकतो, ना ती आमच्यावर.