पाय थरथरले, चालण्यासाठी लोकांचा आधार घेतला; व्हायरल व्हिडीओवर अखेर विनोद कांबळीचं स्पष्टीकरण

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि एकेकाळी ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याचा संघातील सहकारी असणाऱ्या विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडीओ विनोद कांबळीची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे दिसत होते. दुचाकीवरून उतरल्यानंतर विनोद कांबळीचे पाय थरथरत होते. त्याला चालण्यासाठीही लोकांचा आधार घ्यावा लागत होता. यामुळे क्रीडाप्रेमींना त्याच्या तब्येतीची चिंता वाटत होती. आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर विनोद कांबळीने स्पष्टीकरण दिले आहे.

काय होता व्हिडीओ?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी एका बुलेटच्या आधाराने उभा असल्याचे दिसते. त्यानंतर तो चालण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचे पाय थरथरू लागतात. त्यामुळे त्याला लोकांचा आधार घ्यावा लागतो. दोन-तीन लोकांच्या आधाराने त्याला जवळच्या इमारतीमध्ये जावे लागतेय. या व्हिडीओमध्ये कांबळी आजारी असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून लोकं विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत होते. तसेच बीसीसीआय, सचिन तेंडुलकर आणि इतर खेळाडूंनीही त्याला मदत करावी अशी मागणीही सोशल मीडियावर जोर धरू लागली होती. मात्र आता यावर कांबळीने स्पष्टीकरण दिले असून हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले आहे.

मी ठणठणीत!

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद कांबळीचे मित्रही सैरभैर झाले आणि मित्राचा हालहवाला जाणून घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. यावेळी कांबळी ठणठणीत असल्याचे दिसून आले. कांबळीने त्याचा शाळकरी मित्र रिकी आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पंच मार्कस यांच्यासोबत बराच काळ घालवला आणि जुन्या दिवसांवर गप्पाही मारल्या. यावेळी त्याने सोशल मीडियावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही केले.

व्हिडीओ जुना

दरम्यान, आमच्या भेटीदरम्यान त्याचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली असून सदर व्हिडीओ जुना आहे. त्याने आता वजनही कमी केले आहे. तसेच त्याला भूकही चांगली लागत असून या भेटीवेळी संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. त्याचा मुलगा क्रिस्टियाने हा डावखुरा फलंदाज असूनतो वडिलांकडूनच फलंदाजीचे मार्गदर्शन घेत आहे, अशी माहिती मार्कस यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दमदार कामगिरी अन् उतरती कळा

विनोद कांबळीने 1991 मध्ये शारजाहमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या वन डे लढतीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध तो कसोटीचा पहिला सामना खेळला. त्याने एकूण कारकिर्दीमध्ये 17 कसोटीत 1084 धावा केल्या. यात त्याच्या दोन द्विशतकांचा, 4 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 227 ही त्याची कसोटीतीत सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच 104 वन डे सामन्यात त्याने टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने 2477 धावा ठोकल्या. दोन शतकं आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. मात्र काही कारणास्तव त्याचा फॉर्मही गेला आणि त्याने संघातील स्थानही गमावले.