हरलेल्या अशोक चव्हाणांनी विधानसभा लढवू नये -तावडे

335

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अशोक चव्हाण यांनी आता आपली उरलीसुरली पत टिकवण्यासाठी तरी विधानसभेची निवडणूक लढवू नये, असा सबुरीचा सल्ला देतानाच अशोकराव राज्यातील 288 मतदारसंघांपैकी कुठेही उभे राहिले तरी पराभूत होतील, असे भाकीत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी येथे केले.

भारतीय जनता पक्षाच्या नांदेड विभागातील 22 मतदारसंघांच्या मीडिया वॉर रूमच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच जिह्यात वाताहत झाली असेही तावडे म्हणाले. यावेळी खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर उपस्थित होते.

भाजपने मला फुकटचा सल्ला देऊ नये
माझ्याविरोधात लढण्यासाठी निष्ठावंत सोडून उमेदवाराची आयात करणाऱ्या भाजपने मला फुकटचा सल्ला देऊ नये, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवणाऱया भाजपला काँग्रेसविरुद्ध लढण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते मिळत नाहीत. याची तावडे यांनी अधिक काळजी केली पाहिजे, असे ते म्हणाले. काँग्रेसला सल्ला देण्यापेक्षा तावडे यांनी भाजपमध्ये होणाऱया बंडाळीवर लक्ष दिले पाहिजे. विरोधी पक्षांनी निवडणूक लढवू नये, असे सांगणारे हे सरकार लोकशाहीचा अवमान करीत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या