पश्चिम बंगालमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार; पंतप्रधानांचा राज्यपालांना फोन

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. ठिकठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत. निकालानंतरच्या दोन दिवसांत हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभर प्रचंड तणाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीश धनखड यांना फोन करून हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

रविवारी रात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत राज्याच्या विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या. यातील 11 मृतांपैकी 6 कार्यकर्ते आपले असल्याचा दावा भाजपने केला आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आपल्या 5 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा दावा केला आहे. हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे.

तृणमूल कार्यकर्त्यांचा केंद्रीय यंत्रणांकडून छळ – ममता

तृणमूल कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. बंगाल हे शांतताप्रिय राज्य आहे. येथील निवडणुकीवेळी केंद्रीय शस्त्रधारी पोलीस यंत्रणांनी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड छळ केला. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले; परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना हिंसाचार न करण्याचे, संयम-शांतता राखण्याचे आवाहन केले, असे ममता बॅनर्जींनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या