मिंधेच्या युवा अध्यक्षाने मांडला श्री विठ्ठल दर्शनाचा बाजार; शॉर्टकट दर्शनासाठी पैसे घेतले मात्र पावती न देताच पसार

व्हीआयपी भाविक कोण याची व्याख्या मंदिर समितीने निश्चित केली नसल्याने व्हीआयपीच्या नावाखाली बोगस व्हीआयपी सोडून भाविकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. तथापि मंदिर समितीकडून याबाबत ठोस अशी भूमिका घेतली जात नसल्याने, पेड दर्शनाच्या या रॅकेटमध्ये समितीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असावा की काय अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरते आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील श्री विठ्ठल भक्त चेतन रविकांत काबाडी (रा. वाशिम, शहापूर, ठाणे) हे आपल्या सहकाऱ्यांसह काल रविवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन रांगेत गर्दी आहे आणि दर्शनासाठी सात ते आठ तास लागतात ही माहिती मिळाल्यानंतर काबाडी यांनी मंदिराला देणगी देवून शॉर्टकट दर्शन मिळते का याची चौकशी केली असता त्यांना फुल विक्रेता सुमित शिंदे याची भेट झाली. काबाडी यांनी शिंदे यांचेकडे शॉर्टकट दर्शनाबाबत विचारणा केली. तेव्हा शिंदे याने माणसी एक हजार रुपये द्यावी लागतील असे सांगितले. त्यावर काबाडी यांनी देणगीची पावती मिळेल का अशी विचारणा केली. शिंदे याने दर्शन करुन आलात की देणगी पावती देतो असे स्पष्ट केले. व्यवहार ठरल्यानंतर काबाडी यांनी शिंदे याच्या मोबाईलवर फोन पे च्या माध्यमातून चौघांचे 4 हजार रुपये सेंड केले.

पैसे जमा होताच शिंदे या भाविकांना घेवून मंदिरात गेला. व्हीआयपी गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला दुरुनच इशारा करुन चौघांना दर्शनाला सोडण्याचे निर्देश केले. सुरक्षा रक्षकाने कसलीही शहनिशा अथवा वरिष्ठांना न विचारता त्या भाविकांना शॉर्टकट मार्गाने मंदिरात प्रवेश दिला. दर्शन रांगेत प्रचंड गर्दी असताना काबाडी यांना काही मिनिटांमध्ये दर्शन घडविले गेले. दर्शन करुन बाहेर पडल्यानंतर काबाडी यांनी शिंदे याचा शोध घेतला असता तो देणगी पावती न देता गायब असल्याचे लक्षात आले.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर काबाडी यांनी मंदिर व्यवस्थापन आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. चार हजार रुपये घेवून दर्शन आणि पावती देतो म्हणणारा फुलविक्रिता सुमित संभाजी शिंदे हा गायब झाल्याचे काबाडी यांनी तक्रारीत सांगितले. पोलिसांनी काबाडी यांची तक्रार जमा करुन घेत घटनेची चौकशी सुरू केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पेड दर्शन देणारा मिधेंचा पदाधिकारी

शॉर्टकट दर्शन देणारा फुल विक्रेता हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचा पंढरपूर शहर अध्यक्ष आहे. श्री मंदिराच्या बाहेर त्याचे फुल विक्रीचे दुकान आहे. फुल विक्री करीत तो दर्शनाचा काळाबाजार करीत असल्याची चर्चा मंदिर परिसरात सुरु आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करुन तो भाविकांची लूट करीत असावा पोलिसांचा कयास असून त्याच्या मोबाईलवर गेल्यांकाही दिवसांत किती जमा झाले आणि ते कोणी केले याची चौकशी पोलीस करीत आहेत. त्याशिवाय मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. यातून पेड दर्शन काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघड होण्यास मदत होणार आहे.

एकावर गुन्हा दाखल, दोन सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी

पेड दर्शन देणारा दलाल सुमित शिंदे याच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर अभिजित मंडले आणि शुभम मेटकरी या दोन सुरक्षा रक्षकांची मंदिर समितीने हकालपट्टी केली आहे. त्याच बरोबर मंदिराला खासगी सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या संस्थेला नोटीस दिली असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.