हिंदुस्थानात मिळणार कोरोनाची मोफत लस ? वाचा काय व्हायरल पोस्टमागील सत्य

देशात कोरोना लसीकरणास सुरूवात झाली आहे. कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात येत असून लवकरच सामन्य नागरिकांनाही ही लस मिळणार आहे.

सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी सरकारसाठी 200 तर सामान्य नागरिकांसाठी 1 हजार रुपयांत कोविशील्ड देण्याचे जाहीर केले आहे. भाजपने बिहारनिवडणुकीपूर्वी मोफत लस देण्याचे जाहीर केले होते. तसेच पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये राज्य सरकारांनी मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे.

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारने मोफत लस न दिल्यास राज्य सरकार मोफत लस देईल असे जाहीर केले आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारने लस मोफत द्यावी अशी मागणी केली आहे.

अशा वेळी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात भाजप नेते नंद गोपाल गुप्ता यांनी अमेरिकेत कोरोनावरील लस 5 हजार, इंग्लंडमध्ये 3 हजार तर हिंदुस्थानात ही लस मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. एबीपी न्युज या हिंदी वृत्तवाहिनीनेही हिंदुस्थानात लस मोफत मिळणार असल्याचे म्हटले होते.


परंतु या विषयी Fact Check केले असता केंद्र सरकराने अशा कुठल्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. अमेरिका, जपान, फ्रान्स आणि नॉर्वे या देशात नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच इंग्लंडमध्ये कोरोना लसीकरणाचा खर्च सरकार करणार आहे परंतु त्यासाठी नागरिकांनी पैसे घेणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या