चंदनतस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश

217

कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनची मोठी मुलगी विद्याराणी हिने शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विद्याराणी ही पेशाने वकील आहे. तामीळनाडूच्या कृष्णगिरी जिल्हय़ात झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव यांनी तिला सदस्य बनवले. गरजू आणि वंचितांसाठी आपण काम करू, असे विद्याराणी म्हणाल्या. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राधाकृष्णनही उपस्थित होते.

चंदनतस्कर वीरप्पन याला विद्याराणी आणि प्रभा अशा दोन मुली आहेत. वीरप्पनची पत्नी मुथ्थुलक्ष्मी ही सध्या तामीळनाडूतील तिच्या मूळ गावात सामाजिक कार्य करत आहे. मुथ्थुलक्ष्मी यांनी वीरप्पनला मदत करणाऱया लोकांचा पोलिसांकडून जो छळ झाला त्या विरोधातही आवाज उठवला होता. चंदनतस्कर, हत्तीची शिकार आणि हस्तीदंतांची बेकायदा विक्री आणि अनेकांच्या अपहरणाप्रकरणी वीरप्पन अनेक राज्यांना हवा होता. अनेक राज्यांनी त्याला पकडण्यासाठी विशेष पोलीस पथके स्थापन केली होती. शेवटी 2004 साली पोलिसांच्या विशेष पथकाबरोबर झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला.

आपली प्रतिक्रिया द्या