
विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. गेल्या तीस तासांपासून एनडीआरएफ आणि पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री 12 नंतर झालेल्या या दुर्घटनेतून आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात आले असून मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक हसती खेळती कुटुंब गाडली गेली. यातीलच एक जोयल कुटुंब होते. या कुटुंबातील मुलीचा पहिला वाढदिवस शेवटचा ठरला आणि इमारत कोसळून माय-लेकीचा मृत्यू झाला.
मंगळवारी उत्कर्षां जोयल या चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता. तो साजरा केल्यानंतर रात्री ही दुर्घटना घडली. त्यात चिमुकल्या उत्कर्षासोबत तिची आई आरोही जोयल (वय -24) या दोघींचा मृत्यू झाला. तर तिचे वडील ओमकार जोयल हे बेपत्ता आहेत. बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे.
रमाबाई अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उत्कर्षा ओमकार जोयल हिचा 26 ऑगस्ट रोजी पहिला वाढदिवस होता. हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. चौथ्या माळ्यावरील घरी छोटेखानी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. केक कापण्यात आला, आनंदाने एकमेकांना भरवण्यात आला. सर्व जण आनंदात होते. पण यानंतर काहीच क्षणात इमारत कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले.
Maharashtra: In the building collapse at Ramabai Apartment in Narangi, Vasai-Virar, two NDRF teams are carrying out rescue operations. So far, 17 people have been accounted for, including 14 dead, one injured, and two rescued. Rescue operations are still underway
(Source: NDRF) pic.twitter.com/3mUeaBNKRt
— IANS (@ians_india) August 28, 2025
दरम्यान, इतर जखमींमध्ये संजय स्वपन सिंग, प्रदीप कदम, जयश्री कदम, विशाखा जोयल, मंथन शिंदे, प्रभाकर शिंदे, प्रमिला शिंदे, प्रेरणा शिंदे यांना विरारमधील तीन रुग्णालयात तर मिताली परमार हिला मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विकासकाला अटक
दरम्यान, या दुर्घटनेनंतर विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकलेले असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच खबरदारी म्हणून जवळच्या इमारतीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवणअयात आले आहे.