विरारमध्ये शिवसेनेत इनकमिंग जोरात

बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या मनमानी कारभाराला कंटाळून या दोन्ही पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्यामुळे या दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला आहे. शिवसेनेकडे विविध पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा कल वाढल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

विरार शिरगाव, टोकरे, दहिसर, कसराळी, भाटपाडा येथील बहुजन विकास आघाडीचे आणि मनसेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना पालघर जिल्हा लोकसभा संघटक जनार्दन पाटील, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, विरार शहरप्रमुख उदय जाधव, विनय पाटील, गिरीश दिवाणजी, जगदीश कदम, विनायक निकम, जनार्दन म्हात्रे, हरिहर पाटील आदी उपस्थित होते. मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाल्याने शिरगाव, टोकरे आणि परिसरात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.