संघनिवड चुकल्याने दारुण पराभव – कोहली

36

सामना ऑनलाईन । लंडन

टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने लॉर्डस्वरील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पराभवाचे खापर संघनिवडीवर फोडले. चुकीचा संघ घेऊन मैदानावर उतरल्यामुळेच इंग्लंडपुढे हिंदुस्थानी संघाला दारुण पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली. हिंदुस्थानच्या फलंदाजी तंत्रात दोष नाही, तर त्यांना मानसिकतेत बदल करावा लागेल. 0-2 फरकाने पिछाडीवर पडल्यानंतरही मालिकेत रंगत निर्माण करायची असेल, तर आम्हाला मानसिकतेत बदल करावा लागेल, असेही विराट यावेळी म्हणाला.

पराभवानंतर कोहली पुढे म्हणाला, लॉर्डस् खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक होती. त्यामुळे उमेश यादवला वगळून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला घेण्याचा निर्णय चुकला. हिंदुस्थानची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहता आम्ही पराभवास पात्र होतो, असे खेदाने म्हणावे लागते. इंग्लंडने मैदानावर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर आमच्यापेक्षा सरस खेळ केला. त्यामुळे यजमान संघाला विजयाचे श्रेय द्यावेच लागेल.

तिसऱ्या कसोटीपर्यंत पाठदुखीतून सावरेन

लॉर्डस् कसोटीदरम्यान विराट कोहलीच्या पाठदुखीने पुन्हा उचल खाल्ली. फटका मारल्यानंतर होणारा त्रास त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. अखेर ‘टीम इंडिया’चे फिजियो पॅट्रिक फरहात यांनी मैदानावर उतरून विराटच्या पाठीला मसाज दिला. तरीही विराटला वेदनाशामक गोळी खाऊन फलंदाजी करावी लागली. मात्र आगामी पाच दिवसांपर्यंत मी पाठदुखीच्या त्रासातून सावरेन, असा विश्वास हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानची तिसरी कसोटी 18 ऑगस्टपासून नॉटिंघहॅममध्ये सुरू होणार आहे.

लढलो नाही म्हणून हरलो!

‘इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थानला एक डाव आणि 159 धावांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. हिंदुस्थानी खेळाडूंनी अतिशय निराशाजनक खेळ केला. संघ जेव्हा पराभूत होत असतो, तेव्हा संघाच्या पाठीशी राहायचे असते. मात्र लॉर्डस् कसोटीत हिंदुस्थानी खेळाडू लढलेच नाहीत म्हणून इतक्या मोठय़ा फरकाने हरले.’
– वीरेंद्र सेहवाग (माजी क्रिकेटपटू)

आपली प्रतिक्रिया द्या