
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह स्टार ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने अवघ्या 20 दिवसांत छप्परफाड कमाई करत तब्बल 1 हजार 600 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले असून सामान्यांपासून ते मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सगळ्यांनीच हा चित्रपट पाहिलाय. या यादीत आता टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीही सामील झालाय. विराट आणि त्याची पत्नी अनुष्काने हा चित्रपट पाहिला असून रणवीर सिंहच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलंय.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट पाहिल्यानंतर विराटने इन्साग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून धुरंधरच्या टीमचे कौतुक केले आहे. इन्स्टाग्रामवर आपली प्रतिक्रिया देताना रणवीर सिंहच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले. मी आज ‘धुरंधर 2’ सिनेमा पाहिला आणि मी पूर्ण आत्मविश्वासानं असं म्हणू शकतो की, हिंदुस्थानात असा चित्रपट यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.या चित्रपटाने प्रत्येक भावना पडद्यावर जिवंत केली आहे. सुमारे 4 तासांच्या या सिनेमात मी एकदाही नजर हटवू शकलो नाही, असे विराट म्हणाला.

विराटच्या या कौतुकामुळे दिग्दर्शक आदित्य धर भारावून गेले आहेत. त्यांनी विराटचे आभार मानले. वा…! मला विश्वास बसत नाहीए की, विराटने सिनेमाचं कौतुक केलंय. विराट, तुझ्याकडून मिळालेली ही पोचपावती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आम्ही नेहमीच आमच्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदुस्थानची मान अभिमानाने उंचवण्याचा प्रयत्न करू,” असे आदित्य धर यावेळी म्हणाले.
‘धुरंधर’च्या पहिल्या भागाने डिसेंबर 2025 मध्ये 1300 कोटींची कमाई केली होती. आता दुसऱ्या भागाने, म्हणजेच ‘धुरंधर 2’ ने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जागतिक स्तरावर 1600 कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, हिंदुस्थान बॉक्स ऑफिसवर 1600 कोटींचा आकडा पार करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.



























































