कोहलीने मिळवून दिलेला सन्मान विसरलात का? हिंदुस्थानी चाहत्यांनी स्मिथला सुनावले

हिंदुस्थानविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्लेजिंगला फारसे महत्त्व नसेल, असे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी म्हटले होते. याचबरोबर वर्णद्वेशाविरुद्धच्या अभियानालाही त्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र ‘टीम इंडिया’ने मालिकेत तोडीस तोड खेळ केल्याने सैरभैर झालेले ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि त्यांच्या पाठिराख्यांनी आपले खरे रंग दाखविले. पाहुण्या संघावर भयंकर शेरेबाजी झाली, तर प्रेक्षकांनी हिंदुस्थानी खेळाडूंना वर्णद्वेशी शेरेबाजी करून शिवीगाळही केली. ज्या संघाविरुद्ध तुम्ही इतक्या टोकाची अखिलाडूवृत्ती दाखवली त्याच संघाचा कर्णधार विराट कोहलीने तुमच्या स्टीव्हन स्मिथला सन्मान मिळवून दिला होता. हे सर्व तुम्ही विसरलात काय? अशी आठवण आता हिंदुस्थानी चाहते सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि त्यांच्या पाठीराख्यांना करून देत आहेत.

तेव्हा विराटच धावून आला होता

दक्षिण आफ्रिकेतील बॉल टेंपरिंग प्रकरणामुळे बंदीची शिक्षा भोगून स्टीव्हन स्मिथ जेव्हा इंग्लंडमध्ये 2019 चा वर्ल्ड कप खेळायला आला तेव्हा इंग्लंडमधील प्रेक्षकांनी त्याला चीटर-चीटर असे हिणवून हैराण केले होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी कोणी त्याची बाजू घेतली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहली स्मिथच्या मदतीला धावून आला होता. विराटने त्याला आत्मविश्वास आणि प्रेक्षकांकडून सन्मान मिळवून दिला होता. मात्र स्मिथसह त्याच्या संघाला व ऑस्ट्रेलियन पाठीराख्यांना विराटच्या त्या बहुमोल मदतीचा विसर पडलेला दिसतोय, अशी आठवण हिंदुस्थानी चाहते सोशल मीडियावर करून देत आहेत.

कांगारूंचे शेपूट वाकडेच

ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेतील बॉल टेंपरिंग प्रकरणातून कुठलाच धडा घेतलेला दिसत नाही. ‘कुत्र्याचे शेपूट वाकडे’  या म्हणीप्रमाणे कांगारूंचेही शेपूट वाकडेच असते असेच म्हणावे लागेल. कारण हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर स्लेजिंग करणे, मुद्दाम बॉडी लाइन गोलंदाजी करून खेळाडूंना जखमी करणे असे रडीचे डाव त्यांनी खेळले. त्यांच्या स्वैर गोलंदाजीमुळे मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, हनुमा विहारी या हिंदुस्थानी खेळाडूंना दुखापती झाल्या. मैदानावर स्लेजिंगचा अतिरेक केल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेन, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसह अन्य काही खेळाडूंना माफी मागावी लागली. आता बघूया ब्रिस्बेन कसोटीत तरी त्यांना उपरती होते की नाही ते.

आपली प्रतिक्रिया द्या