मजबूरीमुळे घ्यावी लागली होती निवृत्ती, सेहवाग निवड समितीवर भडकला

110

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीवरून देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धोनीची निवड होणार की नाही यावरून देखील संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून एका वृत्तवाहिनीवर चर्चा सुरू असताना माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग भडकला असून त्याने त्याच्या निवृत्तीबाबत गौप्यस्फोट केला आहे. ‘माझ्या निवृत्तीच्या वेळी माझ्याशी कुणी चर्चा केली नव्हती. त्यामुळे मला मजबूरीमध्ये निवृत्ती घ्यावी लागली’, असे सेहवागने सांगितले आहे.

‘महेंद्र सिंह धोनीची अखेरची लढत कोणती असेल ते त्याने ठरवायला हवे. त्याबाबत निवड समितीने त्याच्याशी चर्चा करायला हवी. निवड समितीला जर त्याला संघात घ्यायचे नसेल तर त्याला सांगा की आम्हाला आता यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून तू तितका योग्य वाटत नाहीस. त्यामुळे तुझे पुढचे प्लान्स काय आहेत असे त्याला विचारायला हवे. माझ्यावेळी मला असे कुणी विचारले नव्हते. थेट संघातून मला वगळण्यात आले होते’, असे सेहवागने या चर्चेच्या वेळी सांगितले. सेहवाग निवृत्त झाला तेव्हा निवड समितीत माजी फलंदाज संदीप पाटील हे निवड समितीवर होते. सेहवागसोबत ते देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी संदीप पाटील यांनी त्यांचा सहकारी विक्रम राठोड याला सेहवागशी चर्चा करण्यास सांगितले होते अशी माहिती दिली. त्यावर सेहवाग त्यांच्यावर भडकला व म्हणाला संघातून वगळ्ल्यानंतर माझ्याशी चर्चा करण्यात काय अर्थ होता.

आपली प्रतिक्रिया द्या