ऐतिहासिक विशाळगडावरील वादग्रस्त अतिक्रमण हटवण्यासंदर्भात 14 जुलै रोजी गडाच्या पायथ्याशी घरे, दुकाने तसेच प्रार्थनास्थळांची तोडफोड करून हिंसाचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल असलेला संशयित आरोपी रवींद्र पडवळ हा मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत शेकडो पोलिसांचा बंदोबस्त असतानाही कणेरी मठात बिनधास्त वावरत असल्याचे समोर आले आहे.रामगिरी महाराज आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतल्याचा व्हिडीओ त्याने स्वतःच सोशल मीडियावर अपलोड केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दि. 30 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर रोजी येथील कणेरी मठात ‘संत समावेश’ संमेलन झाले. पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तर दुसऱ्या दिवशी समारोपाला मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली होती. आता याच संमेलनात विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी रवींद्र पडवळ यानेही हजेरी लावल्याचे समोर आले आहे. या संमेलनात रामगिरी महाराज तसेच अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याशी संवाद साधल्याचा चक्क व्हिडीओच त्याने स्वतःच सोशल मीडियात शेअर केला.
गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमुळे येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही हा संशयित आरोपी पोलिसांना दिसून आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबतच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उमटू लागल्या आहेत.
राज्य सरकार, पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
विशाळगडावरील वादग्रस्त अतिक्रमणे हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी दोन महिन्यांपूर्वी 14 जुलै रोजी आंदोलनाची हाक दिली होती. पण यावेळी गडाच्या पायथ्याला मोठा हिंसाचार झाला. पायथ्याशी असलेल्या गजापूर येथे काही घरे, दुकाने तसेच प्रार्थनास्थळांची तोडफोड व जाळपोळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांच्यासह 300जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील 30 संशयितांना अटक केली. मात्र, पडवळ आणि साळोखे अजूनही पोलिसांना सापडले नाहीत? मंगळवारी कणेरी मठावर संत संमेलनात पडवळ याने हजेरी लावल्याचे समोर आल्याने सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.