व्होकल ते लोकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मयूर प्रकाश ढोलम

पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये व्होकल ते लोकल होण्याची हीच वेळ आहे सांगत आपल्या देशाने खेळणे बनवण्याच्या उद्योगधंद्यात एकत्र येण्याची गरज आहे असे म्हटले. कारण जागतिक खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षा जास्त आहे. लॉक डाऊननंतर आपल्या देशात स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा तर खेळणी बनविण्याच्या उद्योगातही आपल्याला उतरावेच लागणार आणि हीच उत्तम संधी आहे. आज आपल्याकडे सगळ्यात जास्त चीनच्या खेळण्यांचा सुळसुळाट आहे. कोणत्याही दुकानात खेळणी खरेदी करायला गेले तरी मेड इन चायना हेच वाचायला मिळते. ही खेळणी आरोग्यासाठी अपायकारकही असतात. त्याचा रंग जास्तच भडक असतो आणि ती दीर्घकाळ टिकतही नाहीत. त्यामुळे प्लॅस्टिक आणि इलेक्ट्रॉनिक खेळण्यांचा कचरा आपल्याकडे वाढत आहे. आज आपल्या खेडय़ापाडय़ातील मुले पत्र्याचे डबे, लाकडी ठोकळे जे मिळेल ते खेळण्यासाठी घेतात. बहुधा यातूनच खेळण्याची निर्मितीही करतात. ठोकळ्यापासून छोटय़ा-मोठय़ा गाडय़ा, पत्र्याच्या डब्यापासून ते नारळाच्या करवंटय़ा आणि झाडांची पाने, फुले, फळे वापरून भातुकलीच्या खेळण्यांची निर्मिती करणारे बालकारागीर तर आपल्याकडे पहिल्यापासून आहेत. त्यात पतंग, गोटय़ा, भोवरा आणि गाडा, लोखंडी रिंग गोल करून गल्लीबोळात फिरणारी मुले आणि या खेळांमुळे वाढणारी एकाग्रता आणि समतोल मुलांना लहानपणीच साधता येत होता. असे कितीतरी खेळ आणि खेळणी काळाच्या पडद्याआड गेली. मुले आता मोबाईलवर खेळू लागली आणि एकलकोंडी होऊ लागली. आता तर कित्येक पालक मुलं तीन-चार वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या हातात मोबाईल देऊ लागली आहेत. त्यात त्यांना मोठेपणाही वाटू लागला आहे. या मोबाईलने मुलांचे मैदानी खेळ तर कमी केलेच, मुलांच्या बालपणातील खेळ आणि भातुकलीचा डावही मोडला. इंडिया डिजिटल झाली आणि आता तर टाळेबंदीनंतर शिक्षणही ऑनलाइन झाले आहे, पण खेळणी ही प्रत्येक व्यक्तींच्या बालपणापासून ते पुढे वृद्धापकाळापर्यंत सोबत असतात. जशी सावंतवाडीतील लाकडी खेळणी ही प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे भातुकलीसाठी फार पूर्वी तांबे, पितळेची आणि नंतर स्टीलची खेळणीही बनवत होते. आपल्याकडे मातीचीही उत्तम खेळणी बनत होती आणि यातून आपल्या देशातील आणि ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळत होता. तेव्हा हीच वेळ आहे व्होकल ते लोकल होण्याची.