मोदींनी देश महासत्तांना विकून टाकला, व्होट चोर, गद्दी छोड… ममता बॅनर्जी विधानसभेत गरजल्या!

निवडणूक आयोग व भाजपची संघटित मतचोरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चव्हाटय़ावर आणल्यानंतर रस्त्या-रस्त्यांवर दिला जाणारा ‘व्होट चोर, गद्दी छोड’चा नारा आज थेट पश्चिम बंगाल विधानसभेत घुमला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात ही घोषणा दिली. सत्ताधारी सदस्यांनीही त्यांना साथ दिली. मोदींनी देशाची प्रतिष्ठा महासत्तांना विकून टाकली, असा हल्ला त्यांनी चढवला.

भाजपशासित राज्यांत बंगाली भाषिक स्थलांतरितांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात बंगाल विधानसभेत शासकीय ठराव मांडण्यात आला आहे. त्यावर बोलायला उभ्या राहिलेल्या ममता बॅनर्जी यांच्या भाषणात भाजपचे सदस्य अडथळा आणत होते. त्यामुळे संतापलेल्या ममतांनी इतिहासापासून वर्तमानाचे दाखले देत भाजपवर सडकून टीका केली.

‘‘मोदी सरकारने देशाची प्रतिष्ठा जगातील महासत्तांना विकून टाकली आहे. मोदी कधी अमेरिकेसमोर हात पसरतात, तर कधी चीनसमोर याचना करतात. त्यांना देश चालवता येत नाही, देशाचे हित जपता येत नाही आणि आम्हाला लेक्चर देतात,’’ असा टोला ममता यांनी हाणला.

मोदी-शहांचे सरकार लवकरच कोसळेल!

‘एक दिवस असा येईल की भाजपचा एकही आमदार या सभागृहात दिसणार नाही. लोक तुम्हाला सत्तेतून बाहेर फेकून देतील. केंद्रातील मोदी-शहांचे सरकार लवकरच कोसळेल, असा संतापही ममतांनी यावेळी व्यक्त केला.

मार्शलला बोलवावे लागले!

‘‘भाजपच्या वैचारिक पूर्वजांचे देशाच्या स्वातंत्र्यात काडीचेही योगदान नाही. त्यांनी देशाचा विश्वासघात केला,’’ असा हल्ला ममतांनी आरएसएस व जनसंघावर केला. दोन्ही बाजूंकडून शाब्दिक चकमक वाढल्याने व काही आमदार हौद्यात उतरल्याने मार्शल्सला सभागृहात बोलवावे लागले.