मतचोरी ही देशविरोधी कृती, निवडणूक आयोगावर RSSचा कब्जा अन् आयोगाची सत्ताधाऱ्यांशी अभद्र युती; राहुल गांधींचा घणाघात

“आज निवडणूक आयोगवरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कब्जा केला आहे. मी निवडणुकीतील अनियमिततेचे पुरावे दिले. सरकार निवडणूक आयोगाशी संगनमत करून मतचोरी करत आहे”, असं म्हणत आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आज लोकसभेत निवडणूक सुधारणेवर चर्चा झाली. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “आज शैक्षणिक संस्थांवर कब्जा केला गेला आहे. कुलगुरूंची नियुक्ती गुणवत्तेवर नाही तर, एका संस्थेशी संलग्नतेवर आधारित करण्यात आली आहे. सीबीआय आणि ईडी या संस्थांवरही त्या संघटनेशी संबंधित लोकांनी कब्जा केला आहे. तिसरी महत्त्वाची संस्था म्हणजे निवडणूक आयोग, त्याच्यावरही त्या संघटनेचाच कब्जा आहे आणि ती देशातील निवडणुका नियंत्रित करत आहे. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत.”

ते म्हणाले की, “भाजप लोकशाहीला धोका पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. सरन्यायाधीशांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणूक प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले. मी स्वतः त्या बैठकीत उपस्थित होतो, एका बाजूला पंतप्रधान मोदी आणि अमित शहा बसले होते, आणि दुसऱ्या बाजूला मी होतो. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने असे केले नव्हते. डिसेंबर २०२३ मध्ये नियम बदलण्यात आले, ज्यामध्ये कोणत्याही निवडणूक आयुक्तांना शिक्षा होऊ शकत नाही, अशी तरतूद करण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी हे जाणीवपूर्वक करण्यात आले . सीसीटीव्ही आणि डेटा संदर्भातील नियमही बदलण्यात आले. सत्ताधारी आणि निवडणूक आयोग यांच्यात पूर्ण सामंजस्य आहे. हा फक्त डेटाचा प्रश्न नाही, हा थेट निवडणुकांचा प्रश्न आहे.”