
एक महिन्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासांठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी आलो आहोत. ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे. मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की, या मोर्चानंतर आपण विनम्रपणे आपआपल्या जिह्यात जा आणि तुमच्या कलेक्टरला भेटा. त्यांना विनंती करा की, तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा की, तुम्ही सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता. ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करा. जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, तर या सरकारला आम्ही कुठेही फिरु देणार नाही.”
त्या पुढे म्हणाल्या की, “एकतर आमच्या लाडक्या बहिणींना निधी दिला. दिला तर दिला त्यात पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख महिलांची नावे कमी केली, हे आम्ही सहन करणार नाही. याविरोधात मोठं जनआंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गावा गावात-वस्त्यांवर जाऊ ज्या महिलांचे पैसे बंद केले आहेत, तिच्याशी संघर्ष करु व पैसे मिळवून देऊ.”


































































