
राजा वराट | संगमनेर
अकोले तालुक्याच्या आदिवासी भागासाठी वरदान ठरणारे मुळा खोर्यातील पहिल्या आंबित धरणाच्या भिंतीला धोकादायक तडे पडले आहेत. भिंतीवरील काँक्रीट वाहून गेल्यामुळे आतील लोखंडी गजही उघडे पडले आहेत. तसेच भिंतीवरून पाण्याचा जोरदार प्रवाह थोपवून धरणारे पॅनल 1991 साली धरणाच्या बांधकामानंतर झालेल्या पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत. लघु पाटबंधारे विभागाने गेल्या 28 वर्षांत याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, असे असले तरी धरणाला कोणताच धोका नसल्याचा दावा नगर जलसंपदा विभागाने केला आहे.
अकोले तालुक्यात अतिदुर्गम भागात आंबित धरण आहे. मुळा खोर्यात आणि पाणलोट क्षत्रातले हे धरण महत्त्वाचे आहे. या ठिकाणी दरवर्षी मुसळधार पाऊस होत असतो. नदीचा प्रवाहसुद्धा खूप वेगात असतो. धरणाच्या भिंतीवरून पडणारा पाण्याचा प्रवाह रौद्र असतो. धरण ओव्हरफ्लो झाल्यावर हे पाणी भिंतीवरून मोठ्या प्रमाणात आणि वेगाने नदीकडे झेपावते. यामुळे या धरणाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. शिवाय काँक्रीट वाहून गेल्याने आतील लोखंडी गजही उघडे पडले आहेत.
भिंतीवरून पडणार्या पाण्याच्या आघाताने भिंतीला धोका होऊ नये व प्रवाहाचा वेग मर्यादेत राहावा म्हणून वेग नियंत्रित करण्यासाठी पॅनल बांधण्यात आले होते. मात्र, सन 1991 साली धरण बांधल्यानंतर पहिल्याच वर्षी प्रचंड पाऊस पडला. त्यात मोठा पूर आल्याने हे पॅनल वाहून गेले होते. लघु पाटबंधारे विभागाने मात्र 28 वर्षांत आजवर या पॅनलच्या दुरुस्तीसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे धरणाच्या भिंतीवरून पडणार्या पाण्याच्या हादर्यांमुळे भिंतीला मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत. परिणामी भिंतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून, भविष्यात धरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
भिंतीला तडे गेलेले असले, तरी धरणाला कोणताही धोका नाही; परंतु भिंतीला पडलेल्या भेगा व मोठे खड्डे बुजविण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात येणार असून, लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. पाण्याचा प्रवाह रोखणारे पॅनल धरण बांधल्यानंतरच्या पहिल्याच वर्षीच्या पुरात तुटले होते. आता या पॅनलचेही काम सुरू होणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागावर ती जबाबदारी आहे. धरण सुरक्षितता विभाग, नाशिकच्या अधिकार्यांनी धरण स्थळावर भेटही दिली आहे. लवकरच दुरुस्ती सुरू करण्यात येणार आहे. – किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, नगर.

































































