आष्टीमध्ये वाड्याची भिंत कोसळली; दुर्घटनेत वृद्धेचा मृत्यू

आष्टी शहरातील कालिका मंदिर परिसरात जुन्या वाड्याची भिंत अंगावर पडून झोपलेल्या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. आबई लक्ष्मण वारे (वय 78) असे मृत वृद्धेचे नाव आहे. मंगळवारी रात्री घडलेली ही घटना बुधवारी समजली. आष्टी शहरातील कालिका मंदिर परिसरात आबई वारे ही वृद्धा आपल्या मोठ्या वृद्ध बहिणीसह अनेक वर्षांपासून राहत होती. कालिका मंदिर परिसरातील जीर्ण अवस्थेत असलेल्या पाटील वाड्यात या बहिणींचे वास्तव्य होते.

आष्टी शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पावसाने या वाड्याच्या जीर्ण भिंती व माळवद कमकुवत झाले होते. नेहमीप्रमाणे आबई वाड्यातील खोलीलगत असलेल्या बोळीत, तर त्यांची मोठी बहीण खोलीत झोपल्या होत्या. रात्री पावसाची भुरभुर सुरू होती. त्याचवेळी जीर्ण झालेली मातीची भिंत आबई यांच्या अंगावर पडली. त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. आबई यांच्या मोठ्या वृद्ध बहिणीला अनेक दिवसांपासून दिसत नाही. आबईच त्यांची सेवा करीत असत. नेहमीप्रमाणे आबई चहा-पाणी द्यायला न आल्याने त्यांची मोठी बहीण हाका मारत होती. मात्र, त्यांचा आवाज क्षीण असल्याने शेजारीपाजारी ऐकू गेले नाही. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास परिसरातील लहान मुले वाड्याकडे खेळावयास गेल्याने त्यांना वृद्धेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी घरी येऊन सांगितल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता बाहेरून कुलूप असलेल्या खोलीतून वृद्धेचा आवाज येत होता. तर बाजूला भिंत कोसळलेली होती. त्याखाली उकरून पाहिले असता आबईचा मृतदेह दिसून आला. शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या