हे आपलेही कर्तव्य आहे

362

>> विशाल देवकर

हरिश्चंद्र गड. प्रत्येक दुर्गप्रेमीचा आवडता. प्राचीन गुहा, दूर्मिळ मूर्ती. अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींनी सजला आहे.

रिश्चंद्रगड पूर्ण पाहावयाचा असल्यास दोन ते तीन दिवसांची सवड काढली पाहिजे. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही अनेक आहेत. हरिश्चंद्रगडाच्या पोटात अनेक गुहा आहेत व प्रत्येक गुहेचे वेगळे असे वैशिष्टय़ आहे. त्यातील महत्त्वाची प्रथम गुहा म्हणजे केदारेश्वराची गुहा होय. या गुहेत एक मीटर उंच आणि दोन मीटर लांब असे भव्य शिवलिंग असून या शिवलिंगापर्यंत पोहचण्यासाठी अथवा शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फाळ पाण्यातून जावे लागते. अगदी उन्हाळय़ातसुद्धा. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. ही गुहा खरं तर चार खांबांवर तोलली होती, मात्र कालौघात आता त्यातील फक्त एकच स्तंभ शिल्लक आहे, उरलेला एक स्तंभ तोही इतर गडअवशेषांप्रमाणेच शेवटच्या घटका मोजत आहे. हरिश्चंद्रेश्वराच्या दक्षिणेस व तारामती शिखराच्या पोटात अजून एक उल्लेखनीय गुहा आहे. गजानन मूर्तीवरून त्या गुहेस गणेश गुहा असे म्हणतात. युक्तीचे आणि अचाट बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून पूर्वजांनी गणेश देवतेला आपल्या देव्हाऱ्यात आणले.

अल्पावधीत अनेक भक्तगण निर्माण करण्यात या देवतेचे पुराणांत अनेक उल्लेख आहेत. आजही आपण बघू शकता मंदिरांच्या ते कोणत्याही देवी-देवतेचे असो, चौकटीवर ‘गणेशपट्टी’ विविध नक्षीकामाने अलंकृत केलेली असते. लेण्यांमध्ये आणि गडकोटांवर गणेश शिल्प आजही आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकवून आहेत. देवतांमध्ये गणेशाला गौरीशंकर पुत्र म्हणून अग्रस्थान आहे. प्रथम याच देवतेची आजही पूजा केली जाते. दऱ्याखोऱ्यांच्या सह्याद्रीत फिरत असताना अनेक मंदिरे, लेणी, घाटमार्ग आणि गडकोटांच्या आजवर वाटा तुडवल्या त्यात कुठे महादरवाजात तर कुठे पाण्याच्या टाक्यांच्यावर तर कुठे कडय़ात अनेक रूपांतील विविध आसनांमध्ये नानाविध शस्त्र घेऊन विराजमान असलेले गणेश पाहिले, परंतु या मूर्तीचा बारकाईने अभ्यास केल्यास एक बाब तुमच्या पटकन लक्षात येते की, या मूर्तीचे ‘लिंग’ स्पष्ट दिसत आहे. या ठिकाणाव्यतिरिक्त अशी मूर्ती माझ्या पाहण्यात कधीच आली नाही. म्हणून या गणेश लेणी परिसरात आढळणाऱया बहुतेक सर्व गणेशमूर्ती अशाच प्रकारातील दुर्मिळ आहेत असे मला वाटते. कोणे एकेकाळी आत्मज्ञानाच्या शोधात या निर्मनुष्य प्रदेशात तपश्चर्या करण्यासाठी खोदलेल्या या गुहा आता आधुनिक तापसांची मदिरापानाची तृष्णा शमविताना दिसतात. या संपूर्ण लेणी समूहाच्या आसपास रिकाम्या केलेल्या मद्याच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडलेला दिसतो. मला मोठे कौतुक वाटते या लोकांचे! इतके श्रम करून हे लोक मदिरापान करण्यासाठी इथपर्यंत पायपीट करतात. श्री गणराज त्यांच्या या कष्टप्रद तपस्येचे त्यांना मधूर फळ नक्कीच देत असणार. असो. हरिश्चंद्रगडावरील हेमाडपंथी वापी म्हणजेच सप्ततीर्थ हे विशेष असून त्या प्रशस्त तीर्थकुंडात डिसेंबर अखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला चौदा देवळय़ांमध्ये चौदा विष्णूमूर्ती विराजमान होत्या. त्यातील काहीच आता शिल्लक आहेत. या देवालयाची व या बांधिव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली. तेथील काही विष्णूमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णूमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत.

दरवर्षी महाशिवरात्रीला गडावर मोठी गर्दी जमत असते. नुकतीच साजरी झालेल्या महाशिवरात्रीलासुद्धा झाली होती. याच गर्दीचा भाग असलेल्यांनी चक्क गडावर असलेल्या पुष्करणीत आंघोळ उरकून घेतल्याचे फोटो सोशल मीडियावरून झळकले. असे प्रकार आजघडीला सहज घडत असतात. वास्तविक पाहता तिथे एक सुरक्षा रक्षक नेमणे किंवा काही नियम घालून त्याचे उल्लंघन केलेल्यास कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, मात्र असे कुठे होताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वी कोकणकडय़ाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लोखंडी कुंपण घालण्यात आले. मुळात इतर अनेक पर्यायी उपाय असताना व गडकिल्ल्यांच्या इतर गड अवशेष रामभरोसे असताना ते जतन, संवर्धन होणे जास्त गरजेचे आहे. मुळात दुर्गमता, रांगडेपणा हाच आपल्या गडाचा खरा दागिना आहे. असे असताना त्याच्या सौंदर्यात कृत्रिम घटकांचा निभाव लागणार नाही. दुर्ग संवर्धन, गडकिल्ल्यांचा विकास हे आपण गडकिल्ल्यांवर रोप-वे, मुख्य दरवाज्यापर्यंत डांबरी रस्ता इत्यादींना म्हणता येईल का? असल्या विकासाच्या नावावर आपण या दुर्गाचे आजवरकिती नुकसान केले आणि करतोय. तितकेच तो गड किती सोसतोय याची कोणी मोजदाद करणार आहे का?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या