
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात झडशी येथे बुधवारी पहाटे 3 वाजताचे सुमारास उपचारासाठी दाखल केलेल्या एका मुलावर डॉक्टरशी फोनवर बोलत आरोग्य सेवकाने उपचार केले. या घटनेत त्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. तसेच हलगर्जीपणा करणारे डॉक्टर तथा आरोग्य सेवकावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी घटनास्थळी भेट देऊन डॉ .रविंद्र देवगडे यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे.
श्रेयस किशोर नवघरे वय 16 रा. टाकळी(झ) याला उलट्यांचा त्रास होत होता. त्यामुळे आज पहाटे तीन वाजता झडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. या वेळी दवाखान्यात आरोग्य सेवक ज्ञानेश्वर भगत यांच्यासह मलिक नावाचा शिपाई हजर होता. यावेळी निवासस्थानी असलेल्या डॉ.देवगडे यांना बोलाविण्यात आले होते परंतु डॉक्टरांनी येण्याऐवजी फोनवरच इलाज सांगितला. त्यामुळे आरोग्य सेवक भगत याने अधिकार नसताना त्या मुलाला इंजेक्शन दिले व त्याला घरी पाठवले. 2 किमी अंतरावर असलेल्या टाकळी(झ) येथे जाताच त्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह परत दवाखान्यात आणले व दवाखान्यात तोडफोड केली. कार्यरत डॉक्टर रविंद्र देवगडे हे निवासस्थानी हजर असतानाही त्यांनी रुग्णाची तपासणी करण्याची तसदी घेतली नाही ,उलट फोनवर उपचार सांगून आरोग्य सेवकाकडून बेकायदेशीर उपचार करून घेतल्याने रुगणाचा मृत्यू झाला, असा आरोप करून डॉक्टर व आरोग्य सेवकास निलंबित करा,अन्यथा मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. दवाखान्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली .या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले,सेलूचे ठाणेदार सुनील गाडे, तालुका अधिकारी स्वप्नील बेले,काँग्रेस चे नेते शेखर शेंडे, जि.प. चे माजी अध्यक्ष विजय जैस्वाल ,जिल्हा परिषद सदस्य सौरभ शेळके,टाकळीचे भूषण पारटकर ,अंतरगाव चे सरपंच बाबा उडान यांनी भेट देत परिस्तिथी आटोक्यात आणली. जनतेच्या भावना व परिस्थिती बघून जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांनी चौकशी अंती कारवाई करण्याचे आश्वासन देत पुढील आदेशापर्यंत डॉक्टर देवगडे यांना निलंबित केल्याचे लेखी पत्र दिल्याने जनतेचा रोष शांत झाला. आणि शवविच्छेदनांनासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला.


























































