टाळ-मृदगांच्या जागी आंबे आणि कांदे, कीर्तनकार मंडळी चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. संतांची ही परंपरा भजन आणि कीर्तनकारांच्या माध्यमातून घराघरांत पोहचविण्याचे काम महाराष्ट्रातील कीर्तनकार मंडळी करत असतात; परंतु लॉकडाऊनमुळे कीर्तन बंद झाल्याने आज राज्यातील असंख्य कीर्तनकारांना कांदे आणि बटाटे विकण्याची वेळ आली आहे. तर अजूनही राज्यातील देऊळ बंद असल्याने या कीर्तन आणि प्रवचनकार मंडळीसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संसाराचा गाडा हाकायचा कसा, असा हा सवाल या मंडळींना सतावत आहे.

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतवाणीच्या माध्यमातून ही परंपरा राज्यातील घरांघरांत पोहचण्याचे काम राज्यातील असंख्य कीर्तनकार आणि प्रवचनकार मंडळी करत असतात. दरवर्षी चैत्र पाडवा ते रामनवमी हा काळ कीर्तनकार मंडळींसाठी महत्त्वाचा काळ मानला जातो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी या काळात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे कीर्तनकारांसाठी हा काळ सुवर्णकाळ मानला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देऊळ बंद असल्याने कुठेही कीर्तनाचे आयोजन झालेले नाही. त्यामुळे कीर्तनाशी निगडीत असणारे कीर्तनकार, टाळवादक, तबलावादक, पेटीवादक आणि डेकोरेर्टस मंडळीसमोर पेचप्रंसग निर्माण झाला आहे. दररोजची पोटाची भूक भागवायची कशी, असा प्रश्न या लोकांसमोर उभा ठाकला आहे. अनेक राज्यांतील कीर्तनकार मंडळीच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे पोटाची भूक भागविण्यासाठी अनेकांनी घरातून बाहेर पडत इतर व्यवसायाकडेदेखील वळण्याचा प्रयत्न करीत दिवसाची भूक भागविली आहे.

कीर्तनकार मंडळीच्या व्यथा मांडताना कीर्तनकार प्राची व्यास सांगतात की, आज कीर्तनकार मंडळीसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. आज अनेकांच्या घरात किराणाचे सामान नाही. घर कसे चालवायचे हा प्रश्न सतावत आहे. अनेकांचे घरभाडे थकले आहेत. तर वीज बिलांचा काढता डोंगर कायम आहे. त्यामुळे आज राज्यातील जवळपास सर्वच कीर्तनकार हवालदिल झाले आहेत. कधी एकदा टाळ आणि मृदंग हातात घेऊन कीर्तन सुरू होईल याकडे सर्व कीर्तनकार हात जोडून वाट बघत आहेत. त्यामुळे आमचे सरकारला निवेदन आहे की, सरकारने ज्या प्रकारे लग्नसोहळय़ाला परवानगी दिली त्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पूर्तता करून कीर्तनालादेखील परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.