आषाढी एकादशीनिमित्त राज्यातून अनेक पालख्या पंढरीकडे मार्गस्थ होतात. वारकऱ्यांना पंढरीच्या विठूमाऊलीच्या दर्शनाचे वेध लागतात. अनेक दिंड्या पंढरीकडे मार्गक्रमण करतात. हा राज्यातील महत्त्वाचा पारंपरीक सोहळा असतो. आता वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या अनुदानाला संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच वारकऱ्यांना या अनुदानाची गरज नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
याबाबत प्रशांत महाराज मोरे यांनी सांगितले की, वारीची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. संसार सोडून निरपेक्ष भावनेने हे वारकरी पंढरीची वारी करीत आहेत. स्वकमाईतून दिंडीला 500 रुपयांपासून ते काही हजार रुपयांची भिशी दिली जाते. अनेक ठिकाणी दिंड्यांच्या पंगती ठरलेल्या असतात. अनेक ठिकाणी अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाते. त्यामुळे पंढरीच्या वारकऱ्यांना या 20 हजाराच्या मदतीची आवश्यकता नाही. तो निधी सरकाराने वारीच्या वाटेवर सोई सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा. खरा आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्विकारु नये, असे आवाहनही प्रशांत महाराज मोरे यांनी केले आहे. शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी प्रशांत महाराज मोरे यांनी केली आहे.
प्रत्येक दिंडी दरवर्षी ठरलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत असते. तसेच दिंडीसाठी योग्य आणि नियोजित व्यवस्थापन असते. प्रत्येक दिंडीच्या पंगती ठरलेल्या असतात. तसेच अनेकजण दिंडीला भिशी देतात. त्यामुळे वारकऱ्यांना या 20 हजार रुपयांच्या अनुदानाची गरज नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, तसेच खरा आचार, विचार आणि उच्चार असणाऱ्या वारकऱ्यांनी ही मदत स्विकारू नये, असेही प्रशांत महाराज मोरे यांनी म्हटले आहे.