भाजपचे खासदार नारायण राणे यांना मी धमकी दिली नाही. मराठवाडय़ात येऊ नका असेही म्हणालो नाही. तरीही ते म्हणतात की, जरांगे काय करणार ते बघतो! त्यावर तुम्ही काय माझे बघणार? असा सवाल करून, फुकटच्या धमक्या मला देऊ नका, मी बघायला लागलो तर तुम्हाला कोकणासह महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज नारायण राणे यांना दिला.
फडणवीसांनी मराठय़ांना माझ्या अंगावर घातले तर त्यांची एकही जागा येऊ देणार नाही, असेही आंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्दय़ावरून जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावरून जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर बोलू नये, मी मराठवाडय़ात जाणार तेव्हा जरांगे काय करतो ते बघतो, असे नारायण राणे म्हणाले होते. यावर बोलताना जरांगे यांनी नारायण राणे यांना चांगलेच फटकारले. राणेंना बोलायला लागलो तर मागे सरकणार नाही. विनाकारण मला डिवचू नका. माझ्या नादाला लागू नका. देवेंद्र फडणवीस यांनी मराठय़ांना माझ्या अंगावर घातले तर त्यांची एकही जागा येऊ देणार नाही, असेही त्यांनी सुनावले.
विधानसभेची तयारी सुरू
विधानसभेच्या जागांसाठी आमचीही तयारी सुरू आहे. 29 ऑगस्टपर्यंत काहीच बोलणार नाही. 29ला निर्णय झाल्यास राखीव जागाही लढणार. उमेदवार ठरला की बाकीच्यांनी त्याच्या मागे राहण्याची तयारी ठेवा, असे आवाहन जरांगे यांनी केले.
आंबेडकरांना उत्तर देणार नाही
प्रकाश आंबेडकर जे कुणबी नोंदीच्या विरोधात बोलत आहेत. हरकत नाही, मी मात्र ओबीसीतूनच आरक्षण घेणार. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांना मी कधीच उत्तर दिले नाही, पुढेही देणार नाही. गोरगरिबांचे कल्याण होईल असेच पाऊल मी उचलतो, असे जरांगे म्हणाले.