उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने शहर व उपनगरांतील रस्ते-फुटपाथ फेरीवालामुक्त करण्यासाठी कारवाईची पावले उचलली आहेत. शहरातील 20 ठिकाणी नियमित ‘वॉच’ ठेवून कारवाई सुरू केली असून पालिकेने या कारवाईचा विस्तृत अहवाल उच्च न्यायालयात सादर केला.
फेरीवाल्यांमुळे पादचारी व परवानाधारक दुकानदारांच्या हक्कांवर गदा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने ‘सुमोटो’ याचिका दाखल करून घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका फेरीवाल्यांविरुद्ध अॅक्शन मोडवर आली आहे. महापालिका आयुक्तांनी जून महिन्यात बैठक घेऊन ‘टेस्ट केस’ म्हणून वॉर्डनिहाय 20 ठिकाणांची निश्चिती करून नियमित कारवाई सुरू केली आहे. या भागांत फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत जटील बनला होता. सर्व 20 ठिकाणी ‘पीक अवर्स’ला सातत्याने देखरेख ठेवली जात असून फेरीवाल्यांना रोखण्यासाठी अतिक्रमण हटाव व्हॅन्स तसेच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर फेरीवालामुक्त झालेल्या ठिकाणांची छायाचित्रे न्यायालयापुढे सादर केली आहेत.
पालिकेचे पथक रात्री 11 पर्यंत तैनात
पालिकेचे कर्मचारी सकाळी 8 ते 4 आणि दुपारी 3 ते 11 वाजेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. फेरीवाल्यांना हटवण्याच्या विशेष मोहिमेत पालिका कर्मचाऱ्यांना पोलीस खात्याची मदत घेतली जात आहे. त्या-त्या विभागातील वरिष्ठ निरीक्षक (परवाना/अतिक्रमण हटाव) नियमित नियंत्रण ठेवून आहेत, असे पालिकेने न्यायालयाला कळवले आहे.
या ठिकाणी विशेष मोहीम
पुलाबा कॉजवे, सीएसएमटी ते हायकोर्ट, चर्चगेट ते हायकोर्ट, मोहम्मद अली रोड-लोकमान्य टिळक मार्ग, लालबाग मार्पेट, दादर स्थानक-दादर टी.टी., दादर स्थानक (पश्चिम), वांद्रे- हिल रोड, लिंकिंग रोड, अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक परिसर, अंधेरी-एस. व्ही. रोड, मालाड स्थानक पश्चिम परिसर, भरूचा रोड, एस. व्ही. रोड बोरिवली, मथुरादास रोड, कुर्ला रेल्वे स्थानक परिसर, घाटकोपर रेल्वे स्थानक या परिसरांत पालिकेने नियमित फेरीवालामुक्त कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.