पाणी प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, तज्ज्ञांचा सल्ला

सध्या सर्वत्र फक्त जेवणाला महत्व दिल जातंय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, पण त्यामध्ये पाण्याचा ही मोलाचा वाटा आहे, ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण जे पाणी पितो त्यात खरंतर आरोग्याचे अनेक लाभ असतात. आपल्या शरीरात 70 टक्के भाग पाणी असतं आणि शरीरातील प्रत्येक पेशीला हायड्रेट, डीटॉक्स करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्यामुळे आपण आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारू शकतो. म्हणूनच पाण्याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याबाबत जसलोक हॉस्पिटलच्या डायटेटिक्स विभागाचे प्रमुख आणि चीफ कन्सलटंट डेलनाझ चंदुवाडिया यांनी सविस्तर समजावून सांगितलं आहे.

सतत पाणी पिणे गरजेचे : सध्याच्या जागतिक महासंकटाच्या काळात आपल्यापैकी अनेक जण घरातील आरामदायी वातावरणात काम करत आहे. त्यामुळे कधीतरीच पाणी पिणे ही जणू आपली सवय झाली आहे. कधीही न संपणाऱ्या व्हर्च्युअल मिटिंग्स, कॉन कॉल्स, असाइनमेंट आणि घरातली कामं या सगळ्याचा ताळमेळ बसवताना आपण पाणी प्यायला मात्र विसरतो. अशा परिस्थितीत आपल्याला सतत पाणी पिण्याची आठवण ठेवायला हवी. त्यासाठी पाण्याची बाटली जवळच ठेवा किंवा ही आठवण करून देण्यासाठी एखादे हेल्थ अॅप वापरा.

पाणी आपल्याला डीटॉक्स करत : पाण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे डीटॉक्स करणे. त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीही सुधारते. दिवसभरात शरीरात अनेक टॉक्सिन्स म्हणजेच आपल्या शरीरात विषारी घटक जमा होत असतात, त्यातील काही पर्यावरणातील असतात, काही अन्नातून येतात. डीटॉक्स होण्याची क्रिया मूत्रातून, मलातून आणि घामातून होते म्हणुन भरपुर पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे.

पाण्याचा वंगणासारखा वापर : भरपूर पाणी प्यायल्याने त्याचा वंगणासारखा वापर होतो. ज्यामुळे सांध्यांचे घर्षण कमी होते. त्याचप्रमाणे सांध्यांची आणि कण्याची मजबुती टिकवण्यासाठीही पाणी हवं असत.

कोलेजनच्या निर्मितीसाठी पाणी आवश्यक : केस, त्वचा, नखे यांच्यातील पेशींची बांधणी टिकवून ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. काही प्रमाणात कोलेजनच्या निर्मितीतही पाणी आवश्यक असते. वय वाढल्याच्या खुणा दिसू नयेत यासाठी कोलेजन फार महत्त्वाचं असतं.

शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते : शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रावांचा समतोल राखण्यासाठी पाणी गरजेचं आहे. आपल्या शरीरातील द्रावांचे कार्य योग्य पद्धतीने चालावे यासाठी शरीराचे तापमान योग्य राखणे आवश्यक असते.

शरीरातील चरबी जाळली जाते : आजवरच्या अनेक संशोधनातून हे स्पष्ट झालंय की पाणी आणि शरीरातील चरबी कमी होण्याचा परस्परसंबंध आहे. अधिक पाणी प्यायल्याने वजन कमी झाल्याचे दिसून आले आहे. दररोज कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरले आहे.

रीहायड्रेटशनचा सर्वोत्तम उपाय पाणी : तहान लागणे म्हणजे डीहायड्रेशनचं शेवटचं लक्षण आणि त्यामुळेच प्रत्येकाने दिवसभर पाणी पित राहणं गरजेचं असतं. डीहाड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मंदावते. पाण्याची कमतरता आणि प्रचंड डीहायड्रेशनमुळे रक्तदाबही कमी होतो. अतिसार, पाणी कमी पिणे, पोटाचा फ्लू अश्या कोणत्याही कारणाने डीहायड्रेशन झाले असेल तर तातडीने रीहायड्रेशनचे उपाय करणे आवश्यक आहे. तोंडावाटे किंवा नसेतून द्रवपदार्थ देऊन रीहायड्रेशन करता येते.

शरीरात सक्रियता वाढते : रक्तातील प्रवाहीपणा कायम राखण्यासाठीही आपण पुरेसं पाणी प्यायला हवं. त्यामुळे पोषक घटक शरीरात सर्वत्र सहज पोहोचतात. यामुळे सक्रियता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतोच. शिवाय, चयापचयही सुधारते. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनोलॉजी अॅण्ड मेटॅबोलझिमने केलेल्या संशोधनानुसार 500 मिली. पाण्यामुळे चयापचय 30 टक्क्यांनी सुधारते.

पाणी उकळुन प्यावे : काही शहरांमध्ये जड पाणी असते. अशा ठिकाणी पाणी शुद्ध करून वापरायला हवे. यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 10 मिनिटे पाणी उकळवणे. जिथे पाणी उकळणे शक्य नसेल तिथे ग्राहकांनी पाण्याचा नीट अभ्यास करून सुरक्षित पाण्याचे मार्ग शोधायला हवेत. यासाठी नियमितपणे पाण्याच्या दर्जाची तपासणी केली जायला हवी. यामुळे तुम्ही आरोग्यदायी, हायड्रेटेड रहाल आणि तुमची रोगप्रतिकारशक्तीही बळकट राहील.

आपली प्रतिक्रिया द्या