नाशिकमध्ये सात धरणांमधून विसर्ग; गोदावरीला पूर

गेल्या तीन दिवसांपासून शहर व जिह्यात दमदार पाऊस सुरू असून, गंगापूरसह सात धरणांमधून विसर्ग होत आहे. गोदावरी नदीला यावर्षीचा पहिला पूर आला आहे. सुरगाण्यात पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये गोदापात्रात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरू आहे. सुरगाणा, कळवण, इगतपुरी तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरण साठय़ात वाढ झाली. गंगापूर धरणातून दुपारी 12 वाजता 500 क्यूसेक्स, तीन वाजता एक हजार, तर चारला चार हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर येथून आज सकाळपासून 36 हजार 731, दारणातून 22 हजार 966, भावली येथून 1821, कादवा- 8298, भाम- 5920, तर पालखेड धरणातून 5 हजार 570 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. होळकर पुलाखालून दुपारी एक वाजता 2 हजार 227 क्यूसेक्स विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पहिला पूर आला आहे. गोदाघाटावरील टपऱया, दुकाने हलवण्याचे काम सुरू असून, पाण्यात न जाण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.

सुरगाण्यात महिलेचा मृत्यू

सुरगाणा तालुक्यातील चिचंदा (गहाले) येथील मंगला अमृत बागुल (62) या शनिवारी रात्री सवाआठच्या सुमारास पतीला जेवणाचा डबा देण्यासाठी निघाल्या. करकली नाल्याजवळील पूल ओलांडताना तोल जाऊन त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रविवारी सकाळी नदीकाठी जांभळाच्या झाडाखाली त्यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती तलाठी जितेंद्र भोंडवे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली.

आईसमोर वाहून गेला तरुण मुलगा

निफाडच्या ओझर येथील यज्ञेश राकेश पवार (29) याला नुकतीच चांगली नोकरी लागली. याबद्दल तो आईसोबत रविवारी नाशिकच्या श्रीरामपुंड येथे पूजेसाठी आला होता. पूजाविधी आटोपल्यानंतर तो गोदावरी नदीपात्रातील पायरीवर पाय धुण्यासाठी उभा असताना पात्रात पडला आणि प्रवाहात वाहून गेला. आईसह उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करताच जीवरक्षक व अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू केले. मात्र, रात्रीपर्यंत यश आले नव्हते. नोकरी लागल्याच्या आनंदात केलेला पूजाविधी जिवावर बेतला. आईच्या डोळ्यादेखत तरुण मुलगा वाहून जाण्याची ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.