अर्धा पाऊस संपला तरी घोडबंदर, दिवा, मुंब्यात रोज 70 टँकरने पाणीपुरवठा

शहराला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण 100 टक्के तर भातसा 95 टक्क्यांहून अधिक भरले आहे. यंदाचा पावसाळा अर्धा संपला तरी ठाणे शहरातील घोडबंदर रोड, दिवा आणि मुंब्याला रोज 70 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नेहमीचीच देखभाल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर बिघाड, जलवाहिनी फुटणे, वारंवार कनेक्शन बंद पडणे आदी कारणांसाठी पालिकेला शटडाऊन घ्यावे लागत आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे स्मार्ट सिटी, बदलते ठाणे अशी टिमकी वाजवणारे सत्ताधारी मात्र पाण्याचे योग्य नियोजन करण्यात सपशेल फेल ठरले आहेत.

झपाट्याने नागरीकरण वाढत असून शहराची लोकसंख्या 17 लाखांवर पोहोचली आहे. ठाणे पालिकेचा एक भाग असलेल्या मुंब्रा आणि दिव्यातदेखील योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने त्या भागात दररोज पाण्याच्या नावाने बोंब मारली जात आहे. दरम्यान, दररोज घोडबंदर भागासाठी जवळपास 40, दिवा 10 आणि मुंब्रा शहरासाठी 20 पाण्याचे टँकर लागत आहेत.

उद्या पाणीपुरवठा बंद

येत्या बुधवारी सकाळी 9 ते गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत असा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, पवारनगर, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, कासारवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राममंदिर रोड, मानपाडा, टिकुजीनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, यशस्वीनगर, मनोरमानगर, माजिवडा, कापूरबावडी, सोहम इस्टेट, उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर आणि मुंब्रा रेतीबंदर या परिसरातील नळ कोरडे राहणार आहेत. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे.