राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनता अस्वस्थ झाली आहे. पण राज्यकर्ते राजकारणात व्यस्त आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील पाणी प्रश्नाकडे शिंदे-फडणवीस सरकारचे लक्ष वेधण्यसाठी पिंपरी चिंडवडमधील एका व्यक्तीने आज थेट मंत्रालयातील जाळीवर उडी मारली. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली.
लोकसभा निवडणुकांमुळे गेले अनेक दिवस आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे एरवी गजबजाट आणि गर्दी असणारे मंत्रालय गेले अनेक दिवस हे शांतच होते. निकाल लागले तरी अदयाप आचारसंहिता लागू असल्याने मंत्रालयात तशी फारशी गर्दी नाही. पण संध्याकाळी चारच्या सुमारास मुख्य इमारतीच्या संरक्षक जाळीवर एका व्यक्तीने उडी मारली. क्षणार्धात ही व्यक्ती जाळीच्या मध्यभागी पोहोचली. या व्यक्तीने यावेळी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाही दिल्या. मागण्यांचा क फलकही त्या व्यक्तीच्या हातात होता. मंत्रालय सुरक्षेसाठी असणारे पोलीस तात्काळ तिथे पोहोचले. तेव्हा त्या व्यक्तीने हातातील बाटली काढून त्यातील द्रवपदार्थ पिण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघा पोलीस कॉन्स्टेबल्सनी तात्काळ त्या व्यक्तीच्या हातातून ही बाटली काढून घेतली व त्याला ताब्यात घेतले.
या मागण्या होत्या…
दीपक बच्चे पाटील असे या व्यक्तीचे नाव असून तो पिंपरी-चिंचवडचा रहिवासी आहे. राज्यातील धरणांना सुरक्षा व्यवस्था द्यावी. राज्यातील दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशा मागण्या या व्यक्तीच्या आहेत. संबंधित कोणत्याही खात्याकडे न जाता या व्यक्तीने थेट हे आंदोलन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.