नॅशनल पार्कमध्ये पावसाच्या पाण्याचे नियोजन करणार

30

सामना प्रतिनिधी, मुंबई

संजय गांधी नॅशनल पार्कमधील डोंगरावरील पाणी वाडवल नदीला येऊन मिळते. या नदीवर बंधारे बांधून हे पाणी अडवावे, जिरवावे. यामुळे गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, अशी सूचना पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली होती. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारने आज नॅशनल पार्कमधील पाण्याचे नियोजन करण्यासाठी सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी या समितीचे सदस्य असणार आहेत. नॅशनल पार्कमध्ये पडणाऱया पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी प्रभावी उपाययोजना निर्धारित करणे, त्याच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे आदी कामे ही समिती करणार आहे. एका महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या