कल्याणमध्ये पाणीमाफियांचा जलवाहिनीवर डल्ला

74

सामना प्रतिनिधी।

शहराला पुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून पाणीमाफिया शहरवासीयांच्या हक्काचे पाणी पळवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रेतीबंदर येथून रोज जवळपास 30 हजार लिटर पाणीचोरी होत असून पाणीमाफियांच्या या गोरखधंद्यामुळे कल्याणवासीयांच्या घशाला मात्र कोरड पडली आहे.

कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या 18 लाखांच्या घरात आहे. उल्हास आणि काळू नदीतून पालिका दररोज 345 दशलक्ष लिटर पाणी कल्याण-डोंबिवलीला पुरवते. अनेक भागात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता चाळ, झोपडपट्टीत मोठय़ा प्रमाणात मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून भूमाफिया आणि पाणीमाफियांनी नळजोडण्या घेतल्या आहेत. हे कमी म्हणून की काय, आता कल्याण शहरवासीयांच्या हक्काचे पाणी राजरोस चोरून मिनरल वॉटर कंपन्या आणि भिवंडीतील कोनगाक परिसरातील बांधकाम संकुलांना विकले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. दररोज किमान 30 हजार लिटर पाण्याची चोरी होत असतानाही पाणीमाफिया मात्र मोकाट आहेत. भूमाफिया, पाणीचोर आणि पाणी विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या रॅकेटमुळे प्रामाणिक करदात्यांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अशी होते पळवापळवी
कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातून एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीतून कल्याण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरण्याचे काम केले जाते. ही मुख्य जलवाहिनी असल्याने त्यावर कोणत्याही प्रकारच्या नळजोडणीला प्रतिबंध आहे. मात्र तरीही दहा ठिकाणी एक ते दीड इंच व्यासाची छिद्रे पाडून पाणीमाफियांनी चोरून नळजोडण्या घेतल्या आहेत. या पाइपलाइन थेट भिवंडीतील कोनगावातील एका बांधकाम संकुलात नेल्या आहेत. हा सर्वप्रकार सभागृह नेता श्रेयस समेळ यांनी आज उघडकीस आणल्यानंतर पालिका प्रशासनाची धावपळ उडाली. आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व जोडण्या तोडण्यात आल्या असून पाणीमाफियांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
गुन्हे दाखल करा

गेल्या ऑक्टोबर महिन्यातही आपण हा प्रकार महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर बेकायदा जोडण्या तोडण्यात आल्या. मात्र पुन्हा आता पाणीचोरी सुरू आहे. पाणीमाफियांशी अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याखेरीज इतका गंभीर प्रकार घडूच शकत नाही. आयुक्तांनी याबाबतची चौकशी करून संबंधितांकर गुन्हे दाखल केले पाहिजेत.

आपली प्रतिक्रिया द्या