
सामना ऑनलाईन, पुणे
केरळमध्ये झालेल्या भयंकर अतिवृष्टीमुळे तिथे बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशभरातून तिथल्या नागरिकांना मदतीचा हात दिला जात असून मध्य रेल्वेनेही या पूरग्रस्तांना मदत करण्याचं ठरवलं आहे. इथल्या नागरिकांसाठी मध्य रेल्वेने पिण्याचं पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा फोटो गॅलरी- केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष रेल्वे रवाना
केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे 29 टँकर असलेली विशेष रेल्वे रवाना करण्य़ात येणार आहे. रतलाम रेल्वे स्थानकातून पाण्याचे 15 टँकर असलेली विशेष रेल्वेगाडी निघाली असून ती दुपारी एक वाजेच्या सुमारास पुणे स्थानकात पोहोचणार आहे. पुण्यात या गाडीला आणखी 14 टँकर जोडण्यात येणार आहे. केरळला रेल्वे टँकरद्वारे पाणी पाठवण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली होती. घोरपडी रेल्वे स्थानकात टँकरमध्ये पाणी भरण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. हे काम शनिवारी सकाळी अकरापर्यंत संपेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. रेल्वेच्या एका टँकरची क्षमता 50 हजार लिटर इतकी असून केरळला पुण्यातून एकूण मिळून याप्रमाणे 7 लाख लिटर पाणी पाटवण्यात येणार आहे.

























































