
जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना ‘नाटो’ आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. इराणविरुद्धच्या कारवाईत नाटो देशांनी साथ न दिल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले असून त्यांनी नाटोच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा नाटो आमच्या पाठीशी नव्हते आणि भविष्यातही ते मदतीला नसतील, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून या संघटनेतून बाहेर पडण्याचे आणि ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडचा उल्लेख ‘बर्फाचा एक मोठा आणि गैरव्यवस्थापित तुकडा’ असा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी अनेकदा ग्रीनलँड खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मात्र ग्रीनलँडने ती फेटाळून लावली आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर ग्रीनलँडचे पंतप्रधान जेन्स-फ्रेड्रिक नील्सन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “आम्ही केवळ बर्फाचा तुकडा नसून 57,000 अभिमानी नागरिकांचा देश आहोत आणि जागतिक नियमांचा आम्ही आदर करतो,” असे नील्सन यांनी स्पष्ट केले.
इराणमधील लष्करी मोहिमेला नाटोमधील अनेक युरोपीय देशांनी पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. काही देशांनी अमेरिकेला आपली हवाई सीमा वापरू देण्यास किंवा नौदल सहकार्य करण्यास मनाई केली आहे. मित्रराष्ट्रांच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांनी अमेरिकेला या युतीतून बाहेर पडणार असल्याचे सांगितले आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनीदेखील ट्रम्प यांची नाराजी मान्य केली असून, मित्रराष्ट्रांमधील हा तणाव आता उघडपणे समोर आला आहे.
दरम्यान युद्धाच्या पार्श्वभूमिवर अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र हा करार होऊन काही तास उलटत नाही तोच अमेरिकेने त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघर घालिबाफ यांनी केला आहे. इराण युद्धाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली ही दरी केवळ आखाती देशांपुरती मर्यादित न राहता, आता अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांमधील संबंधांमध्ये मोठी फूट पाडताना दिसत आहे. या सर्व घडामोडींमुळे जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे.
इराण मोहिमेवरून ‘नाटो’मध्ये फूट, डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, “आम्हाला गरज होती तेव्हा…”


























































