मोदी सरकारला धडा शिकवला! हिंदुस्थान हा पराभव कधीच विसरणार नाही! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती

पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या संघर्षात पाकिस्तानने हिंदुस्थानचा पराभव केल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. ‘मोदी सरकारला आम्ही कायमचा धडा शिकवला. हिंदुस्थान हा पराभव कधीच विसरणार नाही,’ अशी दर्पोक्तीही शरीफ यांनी केली.

खैबर पख्तुन्वा प्रांतातील हरिपूर विद्यापीठात ते बोलत होते. ‘6 आणि 10 मेदरम्यान झालेल्या युद्धात आम्ही हिंदुस्थानची सहा विमाने पाडली. त्यात तीन राफेल विमाने होती आणि काही ड्रोन्स होते. मोदी सरकारला असा धडा शिकवला की, ते कधीच विसरणार नाहीत. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि बंगालपासून गुजरातपर्यंत हा पराभव त्यांना छळत राहील’, असेही शरीफ म्हणाले.

हिंदुस्थानने केलेली टीका झोंबली!

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंगळवारी हिंदुस्थानने पाकिस्तानला लक्ष्य केले होते. पाकिस्तानातील अंतर्गत अराजकाचा सीमेपलीकडील दहशतवादाशी थेट संबंध आहे. पाकिस्तानची लोकशाही आणि कायद्याच्या राज्याप्रतिची भूमिका यातच तेथील सध्याच्या अराजकाचे मूळ आहे. याच मानसिकतेतून पाकिस्तान दीर्घकाळापासून दहशतवादाला फूस देत आला आहे. पाकिस्तान हा दहशतवादाचा अड्डा आहे, असे हिंदुस्थानी राजदूत हरीश पर्वतानेनी यांनी सुनावले. हिंदुस्थानची ही टीका शरीफ यांना झोंबली आहे.