
इराण-इस्रायल युद्धामुळे पेटलेल्या जागतिक संघर्षात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे मित्रराष्ट्र असलेल्या नाटो (NATO) देशांमध्ये उघडपणे वाद सुरू झाला आहे. इराणने रोखलेली होर्मूजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली करण्यासाठी नाटो देशांनी लष्करी मदत नाकारल्यामुळे ट्रम्प यांचा पारा चढला असून, त्यांनी या देशांना थेट भेकड (Cowards) संबोधले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय नाटो हा केवळ एक कागदी वाघ आहे. जेव्हा इराणला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून रोखण्याची वेळ आली, तेव्हा हे देश मागे हटले. आता आम्ही हे युद्ध लष्करीदृष्ट्या जिंकले असताना आणि धोका कमी झाला असताना, हे देश तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल तक्रारी करत आहेत. पण मार्ग मोकळा करण्यासाठी मदत करायला तयार नाहीत.”
ट्रम्प यांनी नाटो देशांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना पुढे म्हटले की, “होर्मूजचा मार्ग मोकळा करणे ही एक साधी लष्करी कृती आहे आणि त्यात धोकाही कमी आहे. तरीही हे देश मदत करत नाहीत. भेकडांनो, आम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवू.”
दरम्यान, इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. हा मार्ग जगातील २० टक्के तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे.

























































