मास्क वापरण्यात नगरकरांची उदासिनता, गुलाबपुष्प, मास्क देऊन नगर मनपाची गांधीगिरी

शहरासह जिह्यात कोरोना रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन व आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. मास्क वापरण्याबाबत नागरिकांची उदासीनता दिसून येत असल्याने मनपा आरोग्य विभागाने आज शहरातील कापडबाजार, भिंगारवाला चौक येथे मास्क वापरण्यासाठी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली. यावेळी बॅण्डदेखील वाजविण्यात आला. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आल्याचे मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी मास्क, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा वापर करावा. यामुळे शहरात कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. आपणही मास्क वापरावा व इतरांनाही मास्क वापरण्यास प्रवृत करावे, असे आवाहन डॉ. बोरगे यांनी केले.

गेल्या काही दिवसांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क नसणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. पोलिसांकडूनही अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मनपाकडूनही मास्क न वापरणाऱयांवर कारवाई केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या