
>> स्पायडरमॅन
एलियन्स अर्थात परग्रहवासी, उडत्या तबकडय़ा, रहस्यमयी जीव किंवा वनस्पती असा कोणताही विषय निघाला की, अमेरिकेच्या ‘एरिया 51’ या जगासाठी कुतूहल असलेल्या जागेचा सर्वात आधी उल्लेख केला जातो. या रहस्यमयी जागेचा विषय जगभरात कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या एका मुलाखतीमुळे तो पुन्हा एकदा गाजायला लागला आहे. एका पॉडकॉस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये बराक ओबामा यांना ‘‘एलियन्स आहेत का?’’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना बराक ओबामा यांनी ‘‘हो, ते एलियन्स अस्तित्वात आहेत, पण मी त्यांना कधीही पाहिलेले नाही आणि जगाला वाटते तसे ‘एरिया 51’मध्येदेखील ते लपलेले नाहीत.’’
ओबामा यांच्या या उत्तराने एलियन्सचे अस्तित्व सिद्ध झाल्याचे अनेक उत्साही अभ्यासक म्हणू लागले आहेत, तर ओबामा यांना आपले ब्रह्मांड एवढे मोठे आहे की, एलियन्स अस्तित्वात असणे शक्य आहे. मात्र आजवर त्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत असे स्पष्ट करायचे होते असा एका अभ्यासक गटाचा दावा आहे. आपल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत आपल्याला एलियन्ससंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही आणि त्या काळात ‘एरिया 51’मध्ये कोणत्याही प्रकारचे एलियन्ससंदर्भातील गुप्त कार्यदेखील चालू नव्हते असे त्यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले.
‘एरिया 51’ हा अमेरिकेतील नेवाडामधील सर्वात रहस्यमय असा सैनिकी तळ आहे. मात्र हा सैनिकी तळ नसून अमेरिकेने इथे काही एलियन्सना कैद केले असून त्यांच्यावर संशोधन करत असल्याचा दावा जगातील अनेक अभ्यासक करत असतात. अमेरिकेला एक परग्रहवासीयांचे यान अर्थात उडती तबकडी सापडली असून ती इथे ठेवण्यात आल्याचा दावादेखील केला जातो. अमेरिकेने मात्र या सर्व अफवा असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. या तळावर कायम सैन्याशी संबंधित लोक वावरताना दिसतात. सामान्य लोकांना इथे कडक प्रवेश बंदी आहे.





























































