वेब न्यूज – अजब परंपरा

सोशल मीडियावर आपल्या देशातील भिन्न भिन्न परंपरांची कायम चर्चा होत असते. ज्याप्रमाणे विविध धर्मांचे लोक त्यांच्या परंपरांचे पालन करत असतात, त्याप्रमाणे आपल्या देशात काही गावे, खेडी अशी आहेत, ज्यांना स्वतःच्या अशा खास परंपरा आहेत. तामीळनाडूमधील कलिमायन आणि राजस्थानमधील देवामाळी ही दोन गावे त्यांच्या खास परंपरेच्या पालनामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत.

तामीळनाडूमधील प्रसिद्ध शहर असलेल्या मदुराईपासून 20 किलोमीटर अंतरावर कलिमायन हे गाव आहे. या गावात एकही रहिवासी चप्पल अथवा बूट वापरत नाही. पादत्राणे न वापरण्याची गावाची अनोखी परंपरा पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली आहे. शेती हा इथला प्रमुख व्यवसाय आहे. मात्र शेतकरीच नाहीत, तर इथे शाळेत जाणारी लहान मुलेदेखील चपला, बूट वापरत नाहीत. इथे अपाच्छी या देवाचे पूजन केले जाते आणि हा देव गावाचे रक्षण करतो अशी गावकऱयांची श्रद्धा आहे. या देवाचा सन्मान म्हणून गावकरी अनवाणी राहतात. एखादा गावकरी गावाबाहेर गेला तर तो हातात चपला घेऊन गावच्या सीमेपर्यंत जातो आणि सीमा ओलांडल्यावर पायात चप्पल अडकवतो. परत येताना पुन्हा गावाच्या सीमेवर चप्पल काढून हातात घेतो.

राजस्थानच्या अजमेरमध्ये असलेल्या देवमाळी गावातदेखील एक अनोखी परंपरा पाळली जाते. भगवान नारायणाची भक्ती करणाऱया या गावात सर्व घरे ही कच्ची अर्थात मातीचे बांधकाम केलेली आहेत. हे बांधकाम करताना लोखंड किंवा काँक्रीटचादेखील वापर करण्यात आलेला नाही. गेल्या 700 वर्षांपासून गावात ही परंपरा चालत आलेली आहे. या गावातील घराच्या दरवाजांना कडी अथवा कुलूप लावले जात नाही. एका बातमीनुसार गेल्या कित्येक वर्षांत गावात एकही चोरी झालेली नाही. तसेच या गावातील लोक मांसाहार करत नाहीत व मद्यपानदेखील निषिद्ध आहे. गावातील अगदी थोडय़ा घरांत वीज आलेली आहे. मात्र हे लोकदेखील एसी अथवा कूलरचा वापर करत नाहीत.