वेब न्यूज – अनोखी सीमा

>> स्पायडरमॅन

सध्या जगातील काही प्रमुख देशांच्या सीमा या युद्धाच्या आगीत होरपळत आहेत. मनुष्यहानीच्या सोबत करोडो रुपयांची आर्थिक हानीदेखील या देशांना सोसावी लागत आहे. प्रत्येक देशाला त्याची सीमा ही अत्यंत प्रिय असते आणि तिचे संरक्षण सर्वात जास्त महत्त्वाचे मानले जाते. या सीमांचे रक्षण करणारे सैनिक हे प्रत्येक देशाचे आदर्श असतात. देशासाठी प्रतिष्ठेची असलेली ही सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक देश तारांचे कुंपणदेखील घालतात. मात्र दोन देशांना वेगळी करणारी अशी एखादी सीमा तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या मधून जात असेल तर? हे अनोखे आश्चर्य युरोपमधील बार्ले शहरात बघायला मिळते आणि ते अनुभवण्यासाठी जगभरातले पर्यटक या देशाला भेट देत असतात. युरोपातील बार्ले हे अनोखे शहर दोन देशांच्या सीमेच्या दरम्यान वसलेले आहे. नेदरलॅंड आणि बेल्जियम शहराची सीमा या शहरातून जाते. विशेष म्हणजे या सीमेवर अनेक घरे, दुकाने आणि हॉटेल्स वसलेली आहेत. स्वयंपाकघरात तुम्ही जर एखादा खाद्य पदार्थ बनवलात आणि तो हॉलमध्ये बसून खाल्लात तर तो पदार्थ नेदरलॅंडमध्ये बनवलेला असू शकतो आणि त्याचा आस्वाद तुम्ही बेल्जियममध्ये बसून घेतलेला असतो. ही सीमारेषा ज्या घरांच्या मधून गेलेली आहे अशा एखाद्या घरात या सीमेवर तुम्ही पलंग ठेवलात तर झोपेत जेव्हा जेव्हा तुम्ही पूस बदलाल तेव्हा तेव्हा सहजपणे एका देशातून दुसऱया देशात गेलेले असाल असे गमतीने म्हटले जाते. बार्ले शहराच्या नेदरलॅंडमध्ये असलेल्या भागाला बार्ले नासाऊ असे म्हणतात, तर बेल्जियममध्ये असलेल्या भागाला बार्ले हर्टोग असे म्हणतात. या दोन्ही देशांची सीमा पांढऱया क्रॉसच्या मदतीने चिन्हांकित करण्यात आलेली आहे. या देशाची आणखी एक खासीयत म्हणजे इथे एकाच शहराची दोन नावे, दोन पोस्ट ऑफिस आणि महानगरपालिकादेखील दोन आहेत. मात्र या सर्वांचे नियंत्रण एकाच समितीद्वारे केले जाते. या शहराच्या सीमेवर उभे राहून फोटो काढणे हा इथे येणाऱया सर्व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.