वेब न्यूज – कोण नफ्यात, कोण तोट्यात?

1696

>> स्पायडरमॅन

कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील व्यवसाय, उद्योगधंदे पूर्णत: कोलमडले आहेत. ज्याकडे जगभरात आशेने पाहिले जात असते अशा तंत्रज्ञान कंपन्यांचीही परिस्थिती काही चांगली नाही. परंतु अशादेखील काही कंपन्या आहेत ज्यांनी लॉक डाऊन दरम्यानही नफा कमावला. गेमिंग कंपन्या, व्हिडिओ स्ट्रिमिंग कंपन्या, फिटनेस क्षेत्रातील कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्यांनी आपला नफा टिकवून ठेवला. काहींनी म्हणे अधिक नफादेखील कमावला, तर ट्रान्स्पोर्ट, कार विक्री आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील अमेझॉनसारख्या कंपन्यांना मात्र कोरोनाचा चांगलाच दणका बसला आहे. कोरोना काळातल्या लॉक डाऊनमुळे प्रवासी कंपन्या, कारनिर्मिती करणाऱया कंपन्या यांना सगळ्यात जास्त फटका बसला असे म्हणायला हरकत नाही. सामानाच्या विक्रीवर तसेच वाहतुकीवर बंदी असल्याने ऍमेझॉनसारख्या कंपन्यादेखील अडचणीत सापडल्या. झूम ऍपसारख्याची स्टॉक किंमत डिसेंबरच्या तुलनेत दुप्पट झाली आहे आणि वापरकर्त्यांची संख्या 10 दशलक्षांवरून 20 दशलक्षांवर गेली आहे. या ऍपला यापूर्वी फारशी ओळखदेखील मिळालेली नव्हती, परंतु आता या ऍपचा वापर जवळजवळ सर्व कार्यालयांच्या व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी केला जात आहे. झूमच्या जोडीलाच वर्क फ्रॉम होममुळे रिमोट सॉफ्टवेअर ऍक्सेस असलेल्या टीम व्हय़ूअरसारख्या सॉफ्टवेयरची मागणीदेखील वाढली आहे. लोक आता ऑनलाईन गेम खेळण्यात जास्त वेळ घालवत आहेत. त्यांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. गेम्सच्या विक्रीत 35 टक्के आणि हार्डवेअरच्या विक्रीत 63 टक्के वाढ झाली असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. लॉक डाऊनचा फायदा फक्त गेमिंगच नाही तर व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपन्यांनाही मिळत आहे. करमणुकीसाठी ग्राहक नेटफ्लिक्स आणि अन्य व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपन्यांच्या सेवांवर भरपूर पैसे खर्च करीत आहेत. नेटफ्लिक्सला 1.6 दशलक्ष नवीन ग्राहक मिळाले आहेत. डिस्ने प्लसने मार्चच्या अखेरीस ब्रिटन आणि इतर ठिकाणी नुकतेच प्रक्षेपण सुरू केले आहे. आधीपासूनच त्यांच्याकडे 3.3 कोटी ग्राहक होते, आता त्यांचे साडेपाच कोटी ग्राहक बनले आहेत. नेटफ्लिक्सला हे तगडे आव्हान मानले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या