असे करा फोनचे निर्जंतुकीकरण

1523

>> स्पायडरमॅन <<

सध्याच्या कोरोना रोगाच्या संकटामुळे स्वच्छतेला प्रचंड महत्त्व आले आहे. आपल्या शरीराच्या, मुख्यतः हातांच्या सुरक्षेबरोबरच आपण सतत हाताळत असलेल्या वस्तूंच्या सुरक्षेचीदेखील काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आपला मोबाईल फोन हा तर आता जवळ जवळ आपला एक अवयवच बनला आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणदेखील विशेष महत्त्वाचे ठरणार आहे, पण जसे आपण हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करू शकतो, तसे मोबाईलला करू शकत नाही. मग यावर उपाय काय? त्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने वायरलेस चार्जिंगबरोबरच फोनवरून व्हायरस स्वच्छ करण्यासाठी एक खास उपकरण ‘samsung-uv-sterilizer’ बाजारात आणले आहे.

सॅमसंगच्या या उपकरणामध्ये यूव्ही लाइटच्या मदतीने निर्जंतुकीकरणाची ही प्रक्रिया पार पाडली जाते. केवळ 10 मिनिटांत आपण या उपकरणाच्या मदतीने स्मार्टफोन, हेडफोन्स, इतर गॅझेट्स आणि स्मार्ट वेअरेबल्सचे निर्जंतुकीकरण करू शकतो. हे उपकरण सॅमसंग स्टोअरमध्ये खरेदी करता येईल. या नवीन सॅमसंग यूव्ही लाइट डिव्हाईसच्या मदतीने बऱयाच गॅझेट आणि डिव्हाईसेसची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते. सर्टिफिकेशन ऑर्गनायझेशन इंटरटेक आणि एसजीएस यांनी याची चाचणी केली आहे आणि त्यात असे निदर्शनास आले आहे की, ई. कोलाई, स्टेफिलोकल ऑरस आणि कॅन्डिडा अल्बिकन्ससारखे 99 टक्के बॅक्टेरिया आणि व्हायरस नवीन यूव्ही स्टेरिलायझर्सच्या मदतीने मारले जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारे गॅझेट्सपासून होणारा संसर्ग रोखला जाऊ शकतो.

सॅमसंगने आपल्या ‘मोबाईल पार्टनरशिप’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून सी अँड टीसह या उपकरणाला तयार केले आहे. त्याचे कॉम्पॅक्ट आणि स्लीक डिझाइन त्याला सहजपणे कोठेही नेणे सोपे करते. या निर्जंतुकीकरण बॉक्सच्या मदतीने गॅलॅक्सी एस 20 अल्ट्रा आणि गॅलॅक्सी नोट 10+ सारख्या मोठय़ा आकारातील फोनचेदेखील निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या