विवाह सोहळ्यात डामडोल नको, साधेपणा हवा ! मराठा वधू-वर मेळाव्यात समाजाचा निर्णय

मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील वधू-वर आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. तब्बल 400 वधू-वरांची उपस्थिती मेळाव्यास होती. आई-वडीलांनी आपल्या पाल्यांचा विवाह करताना विवाह सोहळ्याचा डामडौल न करता साधेपणाने विवाह करावा, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

आदित्यनगर सांस्कृतिक भवन येथे मराठा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे, ‘जिजाऊ ब्रिगेड’च्या उज्ज्वला साळुंखे, जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील उपस्थित होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, प्रकाश ननवरे, दिनकर देशमुख, दत्ता जाधव, राजू व्यवहारे, राम माने, हनुमंत पवार, आर. पी. पाटील, तानाजी चटके, नागनाथ पवार, सुशील गवळी, अंबादास सपकाळे, लिंबराज जाधव, परशुराम पवार, शिरीष भोसले, पांडुरंग झांबरे उपस्थित होते.

मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी मेळाव्यामागची भूमिका विशद केली. प्रशांत पाटील म्हणाले, ‘मराठा समाजामध्येच नव्हे, तर इतर समाजांमध्येदेखील मुलींची संख्या कमी होत असल्याची बाब चिंताजनक आहे. पालकांनी मुलाचा अथवा मुलीचा विवाह ठरविताना संपत्ती अथवा पॅकेजकडे न पाहता, स्वकर्तृत्व पाहून विवाह करावा.’

अमोल शिंदे म्हणाले, ‘विवाह सोहळे करताना पालकांनी कोणताही डामडौल न करता साधेपणाने विवाह सोहळे साजरे करावेत. मुलगी देताना मुलांचे कर्तृत्व पाहावे, तरच समाजाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वधू-वर परिचय मेळाव्याचा उद्देश सफल होईल.’