विवाह सोहळ्यातून कोरोनाचा फैलाव; 177 जणांना लागण, 7 जणांचा मृत्यू

प्रातिनिधिक

जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. समारंभ, विविध सोहळे यामुळे कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. सध्या एका विवाह सोहळ्यामुळे झालेल्या कोरोना फैलावाची चर्चा आहे. या सोहळ्यामुळे तब्बल 177 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला 55 जण उपस्थित होते. या आकडेवारीवरून या सोहळ्यातून किती झपाट्याने कोरोनाचा फैलाव झाला हे दिसून येते.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतील मेन राज्यात एका विवाहसोहळ्यामुळे 177 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मेन राज्यातील एका छोट्या शहरात हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव कसा झाला याबाबतचे संशोधन अमेरिकेतील आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने केले आहे. या सोहळ्यात कोणीही मास्क घातले नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आले नव्हते. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला.

मेन राज्यात 7 ऑगस्टला हा विवाह सोहळा झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सोहळ्यात सहभागी झालेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्या व्यक्तीमुळे 27 जणांना समूह संसर्ग झाला असून त्यातील एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर या सोहळ्यात सहभागी झालेल्या 55 पैकी 27 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले. या सोहळ्यानंतर संक्रमित झालेल्या 27 जणांकडून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. या सोहळ्यात सहभागी झालेला एकजण दुसऱ्या दिवशी वडिलांना भेटायला गेला होता. त्याचे वडील आरोग्य सेवक असून त्यांनाही कोरोनाची लागण झाली. ते काम करत असलेल्या केअर होमममधील 38 कर्मचारी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाली.

विवाह सोहळा झालेल्या ठिकाणापासून हे सर्वजण 160 किलोमीटर दूर रहातात. तरीही कोरोना त्यांच्यापर्यंत पोहोचला. कोरोनाचे संक्रमण झालेल्या या कोरोनाबाधितांमधील 6 जणांचा मृत्यू झाला. त्या विवाह सोहळ्याशी संबंध नसून तसेच विवाह सोहळ्याला उपस्थित नसतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली. या सोहळ्यात सहभागी झालेला एकजण या ठिकाणापासून 320 किलोमीटरवर असलेल्या तुरुंगात काम करतो. विवाह सोहळा झाल्यावर एका आठवड्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणे आढळली. या काळात तो काम करत असलेल्या जेलमधील 18 अधिकारी आणि 48 कैद्यांना कोरोनाचे संक्रमण झाले. तसेच अधिकाऱ्यांच्या कटुंबातील 16 जण संक्रमित झाले.

आरोग्य संस्थेने केलेल्या या संशोधनातील आकडे प्रत्यक्ष संक्रमण झालेल्या व्यक्तींपेक्षा खूपच कमी असल्याचे सांगण्यात आले. विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांची माहिती प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आली नव्हती. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या संशोधनात या सोहळ्याला 55 जण उपस्थित होते. त्यापैकी 27 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले. त्यांच्याद्वारे 177 जण कोरोनाबाधित झाले. तर लग्नाशी काहीच संबंध नसलेल्या 7 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या संशोधनामुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव कसा होतो, ते दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या