लग्नाचा हॉल बनला मिर्झापूरचा क्लायमॅक्स! बेछुट गोळीबारात दरोडेखोर ठार

प्रातिनिधिक फोटो

लग्नाचा सजवलेला हॉल… नटूनथटून आलेले वऱ्हाडी.. सनईच्या सुरातलं मंगल वातावरण.. अशात जर अचानक गोळीबार सुरू झाला तर..? मिर्झापूर या गाजलेल्या वेबसिरीजच्या पहिल्या सिझनचा क्लायमॅक्स वाटावा असा एक प्रसंग नुकताच पंजाब येथे घडला.

त्याचं झालं असं की, पंजाब येथील तरनतारन येथे माही रेसॉर्टवर एक लग्न आयोजित करण्यात आलं होतं. सगळी तयारी झाली होती. फक्त नवरा नवरी हॉलमध्ये यायचे बाकी होते. वरातही त्यांच्या मागून येणार होती. थोड्यावेळाने वरात हॉलच्या दाराशी पोहोचली आणि तेवढ्यात तिथे पोलिसांच्या गाड्या येऊन थडकल्या.

पोलिसांनी वरातीला आत जाण्यापासून रोखलं. कारण, पाच दरोडेखोर आतच लपले होते. त्यांना पकडणं अत्यंत गरजेचं होतं. पोलिसांनी वऱ्हाडींना सुरक्षितपणे बाजूला केलं आणि हॉलमधील दरोडेखोरांना बाहेर येण्याचा इशारा दिला. पण, दरोडेखोरांनी आतून गोळीबार सुरू केला.

त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. जवळपास तीन तास हे थरारनाट्य घडत राहिलं. त्यानंतर पोलिसांना एका दरोडेखोराला कंठस्नान घालण्यात यश आलं. तसंच उरलेले चार जण शरण आल्याने त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

या दरम्यान, वधुवरासह सर्व वऱ्हाड्यांना पोलिसांनी संरक्षण दिलं होतं. त्यामुळे आतमध्ये गोळीबाराचा राडा सुरू असताना बाहेर वऱ्हाडी मंडळी थोडी घाबरलेली पण सुरक्षित राहिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या