रेल्वेचा मेगाब्लॉक… वीकेंड; मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कोंडी

वीकेंड आणि रेल्वेचा मेगाब्लॉक याचा ताण मुंबईपुणे एक्स्प्रेस वेवर आला असून शनिवारी (दि. 1) पहाटेपासून पुण्याच्या दिशेने येणाऱया मार्गावर वाहनांच्या आठ ते नऊ किमीच्या लांब रांगा लागल्या होत्या.

पुण्याकडे येणाऱया वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक अतिशय संथगतीने सुरू होती. अमृतांजन पूल ते खालापूर टोलनाका अशा साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी झाली होती.

वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मुंबईकडे जाणाऱया वाहनांना खंडाळा बोगद्याजवळ थांबवत सर्व सहा लेन या पुण्याकडे जाणाऱया वाहनांसाठी काही वेळेचा ब्लॉक घेत सोडण्यात येत होता. तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहनेही लोणावळा एक्झिट या ठिकाणी काही काळ थांबवण्यात आली.

शालेय सुट्टय़ा संपत आल्याने पर्यटक महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा यांसह कोल्हापूर, नाशिक या भागांमध्ये पर्यटनासाठी जात आहेत. तसेच कोकण किनारपट्टीला जाणारे अनेक पर्यटक हे कराड व कोल्हापूरमार्गे जात असल्याने मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. यामुळे शनिवारी पहाटेपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूककाsंडी झाली होती.