जगभरात आहेत ‘असे’ विचित्र कायदे

समाजव्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देशात काही कायदे करण्यात येतात. काही देशात असलेल्या कठोर कायद्यांमुळे ते देश चर्चेत असतात. तसेच काही देश विचित्र कायद्यांमुळेही चर्चेत आहेत. काही देशातील विचित्र कायद्याबाबतची माहिती थक्क करणारी आहे. यातील काही कायद्यामुळे नागरिकांनाही त्रासही होतो.

मद्यपान, सिगरेट, तंबाखू, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांवर अनेक देशात बंदी आहे. मात्र, एका देशात चक्क च्युइंगमवर बंदी घालण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये 2004 पासून च्युइंगमवर बंदी घातली आहे, च्युइंगममुळे अस्वच्छता पसरत असून पक्ष्यांना त्यापासून धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये बाहेरून च्युगंम आणण्यावरही बंदी आहे. एखाद्या प्रवाशाकडे च्युइंगम असल्यास विमानतळावरच ते जप्त करण्यात येते.

घरात अपत्य येणार असेल तर त्याच्या नावाची चर्चा सुरू असते. मात्र, डेन्मार्कमध्ये मुलांची नावे ठेवण्याचा अधिकार पालकांना नाही. मुलांची नावे सरकार ठेवते. सरकारकडून पालकांना सात हजार नावांची यादी दिली जाते. त्यातील एक नाव पालकांना निश्चित करायचे असते. ठेवण्यात येणाऱ्या नावातून मुलाचे लिंग समजावे ही अटही सरकारने ठेवली आहे. या यादीत नसलेले नाव मुलाला ठेवण्याची इच्छा असेल तर त्यासाठी चर्च आणि सरकारची परवानगी घ्यावी लागते.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात जॉगिंग केल्याने आरोग्य चांगले राहते. मात्र, पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी या देशात जॉगिंगवर बंदी घालण्यात आली आहे. 2014 मध्ये राष्ट्रपतींनी जॉगिंगवर बंदी घातली आहे. समाजविरोधातील कारवाया करण्यासाठी समाजकंटक जॉगिंगचा आधार घेत असल्याचे सांगत त्यांनी जॉगिंगवर बंदी घातली आहे.

उत्तर कोरियातील सर्वेसर्वा किम जोंग उन मनमानी कारभरासाठी नेहमी चर्चेत असतात. त्यांनी देशात अनेक विचित्र आणि कठोर कायदे केले आहेत. पश्चिमी संस्कृतीचे अतिक्रमण रोखण्यासाठी उत्तर कोरियात निळ्या रंगाच्या जीन्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तेथे विशिष्ट हेअर कट ठेवणे बंधनकारक आहे. पाश्चात्य फॅशन करणे आणि पाश्चात्य पोशाखावरही बंदी आहे. कोकाकोला आणि इतर शीतपेये, सॅनिटरी पॅड, कंडोम्स, जमीन आणि संपत्ती खरेदी करणे, डिझायनर बुटे, क्रिसमस ट्री, केबल टीव्ही, पाश्चात्य साहित्य, वाय-फाय, इंटरनॅशनल कॉल, म्युझिक कॉन्सर्ट, सफरचंद, स्पोर्ट कार आणि परदेशात सुटीसाठी जाणे या गोष्टींवरही उत्तर कोरियात बंदी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या