विहीर बनतेय जीवघेणी, दोन दिवसांत दोन गाड्या विहिरीत कोसळून अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी शिवारातील विहीर ही अनेकांचा काळ ठरत असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांत या विहिरीत दोन गाड्या पडून अपघात झाले आहेत.

यातला दुसरा अपघात रविवारी झाला. रविवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास एक कार देऊळगाव राजाकडे जात असताना जालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी शिवारातील विहिरीत कोसळली.

कार विहिरीत जात असल्याचे लक्षात येताच महिलेने दीड वर्षाच्या बाळाला गाडीतून बाहेर फेकले. कार पाण्यात बुडल्यानंतर चालक व एक पुरुष पोहून बाहेर पडला. परंतू, एक महिला व चार वर्षाची मुलगी आतच अडकली आहे.

दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत कार पडून दुर्दैवाने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच पुन्हा याच विहिरीत कार पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींची नावे अद्याप कळू शकलेले नाहीत.